नरक चतुर्दशी व लक्ष्मीपूजन

>>वृषाली पंढरी

नरक चतुर्दशीला काली चतुर्दशी, रूप चतुर्दशी, छोटी दिवाळी आणि नरकनिवारण चतुर्दशी या नावानेदेखील संबोधले जाते. नरक चतुर्दशीच्या संदर्भात दोन आख्यायिका प्रचलित आहेत.

नरकासुर नावाचा राक्षस लोकांना त्रास देत होता. तेव्हा श्रीकृष्णाने त्याचा वध केला. मरताना आपल्याकडून काहीतरी चांगले व्हावे या उद्देशाने नरकासुराने वर मागितला की, आजच्या तिथीला मंगलस्नान करणाऱयाला नरकाची पीडा होऊ नये. श्रीकृष्णाने त्याला त्याच्या इच्छेनुसार वर दिला. त्यामुळे नरक चतुर्दशीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान करण्याची प्रथा पडली.

दुसरी आख्यायिका अशी आहे. प्राचीन सनातन साहित्यानुसार नरकासुराचा वध श्रीकृष्ण, सत्यभामा आणि काली या तिघांनी आजच्या दिवशी केला होता. या अनंदाप्रीत्यर्थ या दिवसाची पहाट धार्मिक अनुष्ठान, उत्सव आणि आनंदाने साजरी करतात.

आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला जातो. एरवी अशुभ समजल्या जाणाऱया अमावास्येला या दिवशी मात्र शुभ मानले जाते. या दिवशी संध्याकाळी लक्ष्मीचे पूजन केले जाते. हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे लक्ष्मी स्थिर राहावी म्हणून करतात. त्याने लक्ष्मी स्थिर राहते असा समज आहे. अनेक घरांत श्रीसूक्त पठणही केले जाते. व्यापारी लोकांचे हिशेबाचे नवीन वर्ष विक्रम संवत लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. या दिवशी अभ्यंगस्नान करतात. पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात. त्यावर वाटी किंवा तबक ठेवतात.त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रुपया, दागिने ठेवून त्यांची पूजा करतात. हा दिवस व्यापारी लोक फार उत्साहात साजरा करतात. या दिवशी स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुणी विकत घेतात. तिलाच लक्ष्मी मानून तिची पूजा करतात. हा संस्कार स्वच्छतेचे महत्त्व दाखवतो.

प्राचीन काळी या रात्री कुबेरपूजन करण्याची रीत होती. कुबेर हा देवांचा खजिनदार आणि धनसंपत्तीचा स्वामी मानला जातो. दीपप्रज्वलन करून यक्ष आणि त्यांचा अधिपती कुबेराला निमंत्रित करून पुजणे हा मूळचा सांस्कृतिक कार्यक्रम होता, परंतु गुप्त काळात वैष्णव पंथाला राजाश्रय मिळाल्याने कुबेराबरोबरच लक्ष्मीचीही पूजा होऊ लागली. हिंदुस्थानात विविध ठिकाणी झालेल्या उत्खननात कुशाण काळातील अनेक मूर्ती सापडल्या आहेत. त्यामध्ये कुबेर आणि लक्ष्मी एकत्र दर्शविले आहेत. काही मूर्तींमध्ये कुबेर त्याची पत्नी इरितीसह दाखविला आहे. यावरून असे दिसते की, प्राचीन काळी कुबेर आणि त्याची पत्नी इरिती यांची पूजा केली जात असावी. कालांतराने इरितीचे स्थान लक्ष्मीने घेतले आणि पुढे कुबेराच्या जागी गणपतीला प्रतिस्थापित केले गेले.

अलक्ष्मी म्हणून ज्या देवतेला मध्यरात्री हाकलून देण्याची प्रथा आहे, तीच खरी या सणाची इष्ट देवता असल्याचेही म्हटले जाते. तिला ज्येष्ठा, षष्टी वा सटवी, निर्ऋती या नावांनीही ओळखतात. निर्ऋती ही सिंधू संस्कृतीतील मातृदेवता समजली जाते. तिला ब्राह्मणी संस्कृतीने अलक्ष्मी म्हणून तिरस्कारले असले तरी ती राक्षसांची लक्ष्मी आहे असे देव मानत असल्याचे उल्लेख दुर्गासप्तशतीमध्ये आहेत.

लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने ‘आर्थिक व्यवहारातील सचोटी व नीती’ आणि ‘अर्थप्राप्तीच्या साधनांविषयी कृतज्ञता’ अशी दोन महत्त्वाची मूल्ये मनात रुजतात म्हणून या पूजेचे महत्त्व आहे. म्हणजेच धन कमवा, पण प्रामाणिकपणे हा संस्कार हा दिवस सुचवतो. भगवान महावीर मोक्षाला गेल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी महावीरांचे प्रमुख शिष्य गौतम गणधर यांना ज्ञान प्राप्त झाले म्हणूनच दिवाळीच्या संध्याकाळी लक्ष्मीपूजन केले जाते ते संपत्तीरूपी लक्ष्मी मिळवण्यासाठी नव्हे, तर मोक्ष-लक्ष्मी किंवा आत्मकल्याणरूपी लक्ष्मी मिळवण्यासाठी हाही भावार्थ आहे. गणधर त्यांचा दिव्य ध्वनी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवितात. दिवाळीसाठी जमिनीवर राजस्थानातील प्रथेप्रमाणे तांदळाच्या ओल्या पिठाची रांगोळी काढतात. त्याला ‘मांडणे’ असे म्हणतात. त्यावर पाट मांडून लक्ष्मीपूजन केले जाते.