वाचावे असे काही -रणांगण

डॉ. धीरज कुलकर्णी << [email protected] >>

रणांगण’ या शीर्षकाने मराठीत दोन कादंबऱया अतिशय प्रसिद्ध आहेत. पैकी विश्वास पाटील यांची पानिपतच्या युद्धावर आधारित ‘रणांगण’ ही कादंबरी अनेकांनी वाचली असेलच. आज या लेखात आपण त्यापूर्वीच्या ‘रणांगण’ कादंबरीचा विचार करणार आहोत.

ही ‘रणांगण’ कादंबरी विश्राम बेडेकर यांनी 1939 साली लिहिली. ती प्रसिद्ध झाल्यानंतर पुढची काही वर्षे पहिली आवृत्तीही खपली नव्हती. हं. वि. मोटे यांनी त्यांची पहिली आवृत्ती प्रकाशित केली. त्यावर लेखकाचे नाव छापलेलेच नव्हते. आपले नाव अपयशी आहे, कादंबरीवर त्याचा उल्लेख नको, अशी विनंती बेडेकरांनी केल्याने लेखकाच्या नावाशिवायच कादंबरी प्रकाशित झाली. 1962 साली कादंबरीची दुसरी आवृत्ती आल्यानंतर मात्र ही कादंबरी प्रसिद्धीच्या झोतात आली. अनेक समीक्षकांचे लक्ष तिने वेधून घेतले. अनेकांनी त्यावर विपुल लेखन केले. मूळ कादंबरी फक्त 138 पानांची आहे. 1947 साली तिच्यावर फक्त एक लेख प्रकाशित झाला. मात्र 1999 सालापर्यंत ‘रणांगण’वर इतके लिहिले गेले की, त्या समीक्षेवर आधारित जे पुस्तक 1999 साली प्रकाशित झाले तेच 168 पानांचे होते.

नव्या शतकात नवी पिढी कार्यरत झाल्यानंतर मात्र किरकोळ प्रमाणात या कादंबरीचा उल्लेख झालेला आढळतो. ही कादंबरी एक सामान्य प्रेमकथा वाटत असली  तरीही यातले नाटय़ कुठेही उणावलेले नाही.

सन 1939. दुसऱया महायुद्धाचे ढग साऱया जगावर दाटून आलेले. प्रत्यक्ष युद्धाला अजून तोंड फुटलेले नाही. नाझी जर्मनीतून ज्यू लोक पलायन करतायत एका मोठय़ा बोटीतून प्रवास सुरू होतो. याच बोटीत पाधर विध्वंस हा मराठी मनुष्य प्रवास करतोय. तो मुंबईत उतरणार आहे. ही कादंबरी पाधर, नायिका हॅर्टा ही ज्यू मुलगी यांच्या असफल प्रेमाची कहाणी आहे.

साधारणत वाचकांना अनेक अडचणी पार करून सफल झालेल्या ( म्हणजे लग्नापर्यंत पोचलेल्या) प्रेमकथा वाचणे सवयीचे असते आणि आवडतेही. ज्या काळात ‘रणांगण’ लिहिली गेली त्या काळात अशा लग्न पर्यवसायी कादंबऱया अनेक होत्या. ‘रणांगण’ ही मात्र रूढ चाकोरी मोडणारी, समजुतींना धक्का देणारी आणि सराईत वाचकालाही हलवून सोडेल अशी कादंबरी होती. खरं तर विश्राम बेडेकर हे चित्रपट दिग्दर्शक. ही एकच कादंबरी त्यांनी लिहिली. या कादंबरीच्या लेखनकाळात बेडेकर युरोपमध्ये होते. तिथले लोकजीवन, तत्कालीन युद्धपूर्व परिस्थितीतील ताणतणाव, लोकांचा आयुष्याकडे बघण्याचा बदललेला दृष्टिकोन, आयुष्यात समोर दिसणारे अस्थैर्य, त्यामुळे होणारी मानसिक ओढाताण हे सर्व ते जवळून पाहत होते. नीती, अनितीच्या संकल्पना या युद्धाच्या परिकाळात कशा तकलादू ठरतात हे त्यांना समजले.

पाधर हा प्रेमभंगातून सावरू पाहतोय, त्यातच बोटीवर त्याला हॅर्टा भेटते. हॅर्टालासुद्धा कार्ल या आपल्या प्रियकराला मागे सोडून यावं लागलंय आणि आता त्याच्या पुनर्भेटीची शून्य शाश्वती आहे. हॅर्टा पाधरच्या प्रेमात पडते. पाधरलाही तिच्याबद्दल आकर्षण आहे, पण हे प्रेम आहे की नाही याबद्दल तो साशंक आहे. बोटीवर ज्यू समुदायसोबत इतरही अनेक लोक आहेत. त्यांचे आपापसातील ताणेबाणे, घडणाऱया वेगवेगळ्या घटना यातून हॅर्टा-पाधरची प्रेमकथा पुढे सरकत जाते. या असफल प्रेमकथेचे नाव ‘रणांगण’ का ठेवले असावे यावरून समीक्षकांनी अनेक तर्क बांधले. काहींच्या मते, युरोप हे युद्धभूमी झालेले असल्याने कादंबरीचे नाव ‘रणांगण’ आहे, तर काहींनी हे नावच अनाठायी असल्याचं म्हटलं आहे. थोडा बारकाईने विचार केल्यास ‘रणांगण’ हे नाव किती सार्थ नाव आहे हे आपल्याला पटते. साऱया युरोपला युद्धभूमीचे स्वरूप आलं आहे ही गोष्ट तर खरीच, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे नायक आणि नायिकेची मन:स्थिती. हॅर्टा आणि पाधर हे वेगवेगळ्या सामाजिक, आर्थिक पार्श्वभूमीतून आलेले आहेत. त्यांचा स्वतशी, आयुष्याशी एक संघर्ष सुरू आहे आणि त्यातच ते एकमेकांच्या प्रेमात पडतात. त्यामुळे दोघांच्या संघर्षाची परिमाणे ही वेगळ्याच प्रतलात जातात. एक अनोखे, गूढ युद्ध सुरू होते आणि या युद्धाची भूमी तो त्यांचा संज्ञाप्रवाह असल्याने तेच कादंबरीचे नाव म्हणून सार्थ होते.

‘चित्रीकरण’ या शब्दाचा धागा पकडून पुढे जाताना एक निरीक्षण नोंदवतो की बेडेकरांच्या लेखनातून दिग्दर्शक डोकावतो. संपूर्ण कादंबरी ही प्रवाही कथनामुळे वाचकांच्या डोळ्यांसमोर उभी राहते. एखादा भव्य चित्रपट पाहत असल्याची भावना येते. अनेक समीक्षकांना ‘रणांगण’ची तुलना ‘टायटॅनिक’ चित्रपटाशी करण्याचा मोह आवरलेला नाही. टायटॅनिक दुर्घटना घडली 1911 साली, त्यावर चित्रपट बनला 1998 साली आणि ‘रणांगण’ लिहिली गेली 1939 साली. यातली काळाची तफावत जरी लक्षात घेतली तरी ही तुलना अस्थानी आहे हे समजून येईल. कारण ‘रणांगण’ ही बोटीवरची प्रेमकथा असं समजून आपण पाहू लागलो तर ही फसगत अटळ आहे.

आता ‘रणांगण’च्या समीक्षेबद्दल. ‘रणांगण’वर अनेक समीक्षकांनी किती विस्तृत लिहिलेलं आहे. द.भि. कुलकर्णी यांनी तर ‘पहिल्यांदा रणांगण’, ‘दुसऱयांदा व तिसऱयांदा रणांगण’ असे मोठे लेख तीनवेळा लिहिले. प्रा.एस एस. नाडकर्णी यांनी ‘रणांगण: समीक्षेची साठ वर्षे’ या शीर्षकाचे पुस्तक लिहिले. यात 1999 पर्यंत ‘रणांगण’च्या झालेल्या समीक्षेचा आढावा घेण्यात आला आहे. याशिवाय माधव आचवल यांनी ‘रसास्वाद’ या त्यांच्या पुस्तकात ‘रणांगण’बद्दल एक स्वतंत्र प्रकरण समाविष्ट केले आहे. इतके सारे लिहिले गेल्यानंतरही वाचक आज पुन्हा ‘रणांगण’ वाचतो तेव्हा त्याला नवीन काहीतरी गवसते.