आभाळमाया – ‘स्लीम’ जागे झाले!

>> वैश्विक, [email protected]

जपानी अंतराळ संशोधक भाग्यवान म्हणायला हवेत. कारण त्यांच्या ‘जपान एअरोस्पेस एक्स्प्लोरेशन’ किंवा ‘जॅक्सा’ने चंद्राच्या दक्षिण गोलार्धात यशस्वीरीत्या उतरवलेलं ‘स्मार्ट लॅन्डर ऑफ इन्व्हेस्टिगेटिंग मून’ किंवा ‘स्लीम’ हे यान नुकतंच जागृत होऊन कार्यरतही झालं आहे. केवळ जपानीच नव्हे तर जगातील सर्वच अंतराळ संशोधकांच्या दृष्टीने ही आनंदवार्ता आहे. अंतराळातलं यश कोणत्या का देशाचं असेना, ते सर्व पृथ्वीवासी माणसांचं असतं. म्हणूनच आपण आपलं चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण भागात उतरवण्याचा पराक्रम ‘इस्रो’च्या माध्यमातून केला तेव्हा साऱया जगाने त्याचे कौतुक केले. चंद्राच्या आपल्याला कधी न दिसणाऱया भागात यान उतरवणारा हिंदुस्थान हा पहिला देश ठरला याचा आपल्याला अभिमान आहेच. त्याच सुमारास रशियाचं ल्युना यानही चंद्राच्या दक्षिण भागातच उतरणार होतं. चांद्रयान-3 आणि ल्युनामध्ये स्पर्धा असल्याची अकारण चर्चा झाली. दुर्दैवाने ल्युना अपयशी ठरलं आणि हिंदुस्थान चंद्रावर यान उतरवणारा चौथा देश ठरला. आता जपान हा पाचवा देश या पंक्तीत आला आहे. त्याचं स्वागतच करायला हवं. पृथ्वीवरची विविध प्रकारची भांडणं निदान अंतराळात तरी असू नयेत. मात्र एवढं वैचारिक औदार्य चिन्यांकडे नाही. त्यांनी आपल्या चांद्र मोहिमांबद्दल शंका उपस्थित करत टीका केली. पण हे चालायचंच. अमेरिकेचं ‘इगल’ 1969 मध्ये चंद्रावर उतरलं तेव्हा हीसुद्धा अमेरिकेची चालबाजी आहे असे बिनबुडाचे आक्षेप नंतर बराच काळ केले जात होते. जपानी ‘स्लीम’बाबत तसं कोणी काही म्हटलं नाही हे चांगलंच. पण त्याला वेगळय़ाच समस्येला सामोरं जावं लागलं.

‘स्लीम’ चंद्रावर उतरलं खरं, पण ते कललेल्या किंवा उलटय़ा अवस्थेत स्थिरावलं. त्यामुळे त्यावर बसवलेले ‘सौरपंख’ किंवा सोलार पॅनल सूर्याच्या विरुद्ध दिशेला गेले. अर्थातच त्यावर सूर्यप्रकाश पडण्याची शक्यता नसल्याने यानाच्या ऊर्जेचा स्रोत अचानक बंद झाला. सगळी यंत्रणा सक्षम असूनही केवळ ऊर्जेविना यान निक्रिय ठरलं असतं तर ती फारच दुःखद घटना ठरली असती. पुन्हा त्या सौरपंखांवर ऊन पडायला दहा दिवसांचा अवधी होता. तोपर्यंत प्रचंड शीतकाळात या यानाला पडून राहणं भाग होतं. 19 जानेवारीला चांद्रपृष्ठावर कलत्या स्थितीत उतरलेल्या ‘स्लीम’ने जपानी वैज्ञानिकांच्या काळजाचा ठोका चुकवला. परंतु 29 जानेवारीला त्याच्या सौरपंखांवर सूर्याचा प्रखर किरण पसरला आणि त्याने ‘जादू’ केली. स्लीमवरची सारी मृतवत झालेली यंत्रणा पुन्हा ‘जिवंत’ झाली. यानाला ‘याची देही पुनर्जन्म’ लाभला. अर्थात वैज्ञानिक लेखात असे शब्द अप्रस्तुत असले तरी काव्यात्म भावनेने त्याचं वर्णन तसं करता येईल.

मूळ हेतू साध्य करण्यासाठी चंद्रावर गेलेलं ‘स्लीम’ पुन्हा काम करू लागलं. एवढंच यातून लक्षात ठेवायचं. आता हे ‘स्लीम’ नेमकं काय करणार आहे ते पाहू या. 2017 पासून जपान चांद्र मोहिमेच्या तयारीत होता. परंतु ‘कोविड’ने सगळय़ा जगालाच ठप्प-गप्प केलं होतं. त्याचा फटका जपानी मोहिमेलाही बसला. त्यातच एक्स-रे इमेजिंग आणि स्पेक्ट्रोमेट्री यंत्रणा बनवण्यास थोडा विलंब झाला. अखेर 6 सप्टेंबर 2023 रोजी जपानी रॉकेट ‘स्लीम’सह अवकाशात झेपावलं आणि 1 ऑक्टोबर 2023 ला त्यापासून वेगळं होऊन चंद्राकडे निघालं. व्यवस्थित अंतराळ प्रवास करून 19 जानेवारी 2024 रोजी ते चंद्रावर उतरलं आणि जपानसह सारं वैज्ञानिक विश्व आनंदलं. मात्र लगेचच त्याच्या उलट अवतरणाची आणि सौरपंखांच्या अडचणीची वार्ता आली. आता ती सारी विघ्ने दूर होऊन ‘स्लीम’ कार्यरत झालंय.

ते नेमकं काय करणार आहे? थोडक्यात सांगायचं तर 590 किलो वजनाच्या रॉकेटवरून उडालेलं हे 120 किलो वजनाचे ‘स्लीम’ चंद्राच्या दक्षिण भागातील ‘शिओली’ या विवराजवळ साधारण 300 फुटांच्या वर्तुळात ‘सॉफ्ट लॅन्डिंग’ करण्यात यशस्वी ठरलं. अपोलो-11 वरील अमेरिकेच्या ‘इगल’ यानाने असा अवतरणाचा परिसर 20 किलोमीटर इतका व्यापक ठरवला होता. म्हणजे 1969 पासून अंतराळ यान तंत्रज्ञानात किती प्रगती झाली आहे हे लक्षात येईल.

12 कोटी अमेरिकन डॉलर किंवा 18 अब्ज जपानी ‘येन’ खर्चून तयार झालेलं ‘स्लीम’ चंद्राचं तापमान आणि प्रारणांचं निरीक्षण करणार आहे. हे त्यावरच्या ‘हॉपिंग एक्सकर्शन’द्वारा सुरू झालंय. त्यावरचा ‘वाइड ऍन्गल’ कॅमेरा फोटो व माहिती पाठवतोय. दुसरी गोष्ट म्हणजे ‘स्लीम’मधून पाठवलेला छोटासा रोव्हर किंवा चांद्रगाडी त्यावरील अतिसूक्ष्म कॅमेऱयाने चंद्रपृष्ठाचे प्रभावी फोटो काढेल. हे काम केवळ दोन तासांचे असेल. सध्या ‘स्लीम’वरची सर्व यंत्रणा पाच दिवसांचे अल्पकालीन काम करून विश्रांतीही घेत असेल. पुन्हा ते ‘सौरपंख’ कार्यान्वित होऊन काही माहिती ‘स्लीम’ मिळवेल का ते नंतर कळेलच. पण अल्पमुदतीच्या हेतूनेच पाठवलेल्या ‘स्लीम’ला यश आलंय. चंद्राच्या विषुववृत्ताच्या दक्षिणेला 13 अक्षांशांवर आणि 25 रेखांश पूर्वेला हे यान धक्का खाऊनही इच्छित कार्य पूर्ण करू शकलं ही गोष्ट संशोधकांना प्रोत्साहित करणारी आहे, हे निश्चित!