आभाळमाया- एका दीर्घिकेचा ‘ऱ्हस्व’ प्रवास

>> वैश्विक

विराट विश्वाचा शोध घेण्याची प्रक्रिया कधीच पूर्ण होणारी नाही. विज्ञानाच्याही एखाद्या टप्प्यावर ‘आता सारं समजलंय’ असा समज निर्माण होऊ शकतो. भौतिकशास्त्रात यापुढे संशोधन करण्यासारखं काहीच उरलेलं नाही अशी धारणाही काही काळ निर्माण झाली होती. एकोणीस आणि विसाव्या शतकाने अशी वेगवेगळी वैज्ञानिक स्थित्यंतरं अनुभवली. अल्बर्ट आइन्स्टाइन यांनी मांडलेल्या स्पेशल आणि जनरल ‘रिलेटिव्हिटी’च्या सिद्धांताने विसावं शतक व्यापून टाकलं. पुढे याच शतकाच्या उत्तरार्धात ‘हबल’ यांनी सांगितल्यानुसार किंवा त्यांच्या वैज्ञानिक गणिती मांडणीप्रमाणे विश्व प्रसरण पावत असल्याचे पुरावे सापडले. स्टीफन हॉकिंग यांनी कृष्णविवरासंबंधीचं आपलं संशोधन जगापुढे ठेवलं. विश्व ‘स्थिरस्थिती’ (स्टेडी स्टेट) आहे की प्रसरणशील (एक्स्पांडिंग) आहे यावर मुद्देसूद चर्चा होऊ लागली. अशा अॅपॅडेमिक किंवा अभ्यासपूर्ण मतांतरांच्या चर्चा म्हणजे बौद्धिक खाद्य असतं. नव्या संकल्पनांना त्यातून चालना मिळते. आपल्या संस्कृतीत ज्याला ‘वाद’ म्हणतात ते असं फलदायी डिबेट. त्याची परिणिती ‘वादे वादे जायते तत्त्वबोधः’ म्हणजे रचनात्मक चर्चेतून नवतत्त्व गवसते. उगाच विरोधाला विरोध ते ‘जल्प’ आणि भरकटलेल्या चर्चांना वितंडवाद असे शब्द आपल्या प्राचीन विचारवंतांनी नोंदले आहेत. तेव्हा मूळ ‘वाद’ म्हणजे डिबेट आणि टीका म्हणजे भाष्य किंवा स्पष्टीकरण. त्याचा ‘क्रिटिसिझम’ हा अर्थ इंग्रजीच्या प्रभावाने रुजला असेल.

हे सारं सांगण्याचं कारण असं की, वैज्ञानिक मत-मतांतरांमधून नव्या तत्त्वाकडे जाता येतं. विश्वासारखंच विज्ञानही गतिशील आहे. स्थितीवादी नाही. याच धारणेतून जगात सर्वत्र वैज्ञानिक प्रगती होत गेली. ही प्रक्रिया प्राचीन काळापासून सुरू आहे. ‘रिफ्युट’ झालेल्या किंवा चुकीच्या ठरलेल्या ‘सिद्धांत – संकल्पनां’कडेही यातलाच एक भाग म्हणून पाहिलं जातं. एखाद्या शोधाची कालपर्यंतची धारणा योग्य कशी नव्हती हेही त्यातून कळतं. तुलनात्मक अभ्यास करता येतो. त्यातूनच ‘संपलेलं’ भौतिकशास्त्र भरारी घेऊन पुढे जात राहिलं.

अगदी अलीकडची गोष्ट म्हणजे जेम्स वेब दुर्बिण अवकाशात गेल्यापासून आजवर आपल्याला अज्ञात किंवा अस्पष्ट असलेल्या अनेक गोष्टी अधिक चांगल्या समजू लागल्या आहेत. त्यातूनच विश्वनिर्मितीच्या आरंभीच्या काळात नेमपं काय घडत होतं याचा अंदाज येतोय. ‘जेम्स वेब’ने एका ‘मृत दीर्घिके’चा नुकताच शोध लावला. ‘जीएसझेडसेव्हनझीरोवनक्यूयू’ असं इंग्लिश शब्दांकातील लांबलचक वैज्ञानिक ‘नाव’ असलेल्या या दीर्घिकेचं वैशिष्टय़ असं की, विश्वनिर्मितीच्या अगदी सुरुवातीच्या काळातच, म्हणजे आजचं 13.7 अब्ज वर्षांचं विश्व केवळ पाच ते सात कोटी वर्षांचं होतं तेव्हाच या दीर्घिकेचा मृत्यू ओढवला. वास्तविक ‘बिग बँग’ सिद्धांतानुसार वेगाने प्रसरण पावणाऱया विश्वात अब्जावधी तारे आणि तशाच दीर्घिकाही प्रचंड प्रमाणात निर्माण होत होत्या. त्यावेळी एखाद्या दीर्घिकेचा जन्म होता होताच अंत घडावा ही गोष्ट वैज्ञानिकांचाही विस्मय वाढवणारी आहे, पण तसं घडलं खरं. आपली दीर्घिका आहे आकाशगंगा. त्यात सुमारे 100 ते 400 अब्ज तारे आहेत. त्यापैकी सूर्य नावाच्या सर्वसाधारण ताऱयाभोवतीच्या एका ग्रहमालेतील तिसऱया क्रमांकाच्या पृथ्वी नावाच्या ग्रहावर आपण नांदतो. (या वैश्विक योगाविषयी आपण नंतर ‘ड्रेक इक्वेशन’मध्ये जाणून घेऊ.) आपली ही दीर्घिका विश्वनिर्मितीच्या काळातच तयार झाली. आपली सूर्यमाला आकाशगंगेच्या केंद्रापासून जवळ म्हणजे 27 हजार प्रकाशवर्ष अंतरावर आहे. दीर्घिकेचा एकूण व्यास सुमारे 1 लाख प्रकाशवर्षे एवढा आहे. तर सांगायची गोष्ट म्हणजे आपली आकाशगंगा एवढी अब्ज वर्षे अबाधित आहे. मात्र जेम्स वेबला दिसलेली दीर्घिका ‘बालमृत्यु’ला का सामोरी गेली?

त्याचं वैज्ञानिक उत्तर असं की, विश्वातील आरंभावस्थेत असलेल्या ‘कॉस्मिक डस्ट आणि गॅसेस’मधून अत्यंत वेगाने तारे आणि दीर्घिका निर्माण होऊ लागल्या. ज्यांना ‘बाळसं’ धरण्याइतपं पुरेसं ‘द्रव्य’ गोळा करता आलं ते तारे नि दीर्घिका टिकल्या. इतरांची वाढ खुंटली. पुरेसं द्रव्य किंवा वस्तुमान नसल्याने विश्वातील अनेक मोठे (गुरुसारखे) ग्रह ‘तारे’ होऊ शकले नाहीत. तसंच काही काळ ‘चमकून’ गेलेल्या काही दीर्घिकांनाही एका मर्यादेनंतर द्रव्य जमा करण्याइतपं गुरुत्वाकर्षण लाभलं नसेल आणि त्यांची वाढ खुंटली. मात्र नवल या गोष्टीचं आहे की, उपरोक्त दीर्घिका केवळ पाच-सातशे कोटी वर्षांतच निष्क्रिय का व्हावी? कारण त्या काळात वैश्विक प्रक्रिया अत्यंत वेगाने आणि जोमाने होत होत्या. निप्रभ (कोलॅप्सिंग) नवताऱयांनी सोडलेलं ‘द्रव्य’ संग्रहित करून दीर्घिका आकाराला येत होत्या. असं द्रव्य विश्वारंभीच्या काळात उदंड असणार. तशीच ही दीर्घिकाही आकाराला येऊ लागली होती, पण अचानक थांबलं. या सगळ्यात एकूणच आरंभ आणि अंताच्या पद्धतीचं प्रतिबिंब दिसतं.

सजीवांप्रमाणेच तारेही जन्म घेतात आणि अंत होऊन त्यांचे श्वेतखुजे, न्यूट्रॉन स्टार किंवा कृष्णविवरं होतात हे आपल्याला ठाऊक आहे. पण एखादी संपूर्ण दीर्घिकाच अपूर्ण वाढीमुळे मृत ठरल्याचं जेम्स दुर्बिणीने बहुदा पहिल्यांदाच दाखवून दिलं आहे. कागदावरच्या गणिती समीकरणांना प्रत्यक्ष पुरावे देण्याचं कार्य असं भौतिक संशोधन करत असतं. जेम्स वेबने कॉस्मिक डस्ट पलीकडच्या नेब्युलांचीही स्पष्ट चित्रे (पह्टो) पाठवली आहेतच. या अवकाशी डोळ्याला आणखी काय काय दिसते ते पाहायचं आणि जाणून घ्यायचे.

[email protected]