आभाळमाया – गोफणगती कशासाठी?

>> वैश्विक

आमच्या खगोल मंडळात अशा खगोलीय घटनांची चर्चा होते तेव्हा श्रोते अनेक प्रश्न विचारतात. त्यातला अगदी ‘चांद्रयान-1’ पासून विचारला जाणारा प्रश्न म्हणजे अमेरिकेचे ‘अपोलो-11’ 16 जुलै 1969 रोजी ‘इगल’ या चांद्रयानाला घेऊन उडाले आणि माणसाने 20 जुलैला चंद्रावर पाऊलही ठेवले! आपला इच्छित कार्यक्रम पूर्ण करून नील आर्मस्ट्राँग, एडविन ऊर्फ बझ ऑल्ड्रिन आणि चांद्रकक्षेपर्यंतच गेलेला मायकल कॉलिन्स हे 24 जुलै 1969 रोजी पृथ्वीवर उत्तर पॅसिफिक महासागरात सुखरूप परतले. मग अमेरिकेचे चांद्रयान तब्बल 54 वर्षांपूर्वी अवघ्या एका आठवडय़ात आपली चांद्रमोहीम पूर्ण करते आणि अंतराळवीरांना परतही आणते, तर आपल्या यानाला त्याच चंद्रावर जायला एवढा वेळ का लागतो?…आणि हा ‘स्लिंग शॉट’ काय प्रकार आहे?

आज त्याविषयीच थोडक्यात आणि खूप तांत्रिक माहितीने क्लिष्ट न करता जाणून घ्यायचा प्रयत्न करू या. ‘अपोलो-13’ ही मोहीम अवघ्या जगाच्या दृष्टीने महत्त्वाची होती. त्याला थोडं राजकीय कारणही होतं. रशिया म्हणजे तेव्हाच्या ‘यूएसएसआर’ने 4 ऑक्टोबर 1957 रोजी आपल्या ज्ञानविश्वातला पहिला कृत्रिम उपग्रह ‘स्पुतनिक’ या नावाने अवकाशात धाडला आणि जग चकित झालं, तर अमेरिका मनातून हादरली. तो या देशांमधल्या शीतयुद्धाचा काळ होता. लगेच काही काळाने रशियाचा अंतराळवीर युरी गागारिन अंतराळात भ्रमण करून आला. एखाद्या माणसाने पृथ्वीबाहेर पाऊल टाकण्याची ही पहिलीच वेळ होती. या सगळय़ा गोष्टींनी अस्वस्थ झालेल्या अमेरिकेने जाहीर केले की, ‘‘हे दशक संपण्यापूर्वीच आम्ही चंद्रावर जाऊ!’’ जॉन केनेडींचे त्यांच्या संसदेतले हे उद्गार सत्यात आणण्यासाठी अमेरिकेची स्पेस विज्ञान संस्था ‘नासा’ कामाला लागली आणि पुढे 1969 मध्ये चांद्रविजयाचा इतिहास घडला. आधी आर्मस्ट्राँग आणि नंतर सहा तासांनी ऑल्ड्रिन चंद्रावर उतरणारे पहिले मानव ठरले. 8 दिवस, 3 तास, 18 मिनिटे आणि 35 सेकंदांची ही विश्वविक्रमी यात्रा यशस्वी करून आर्मस्ट्राँग, ऑल्ड्रिन आणि कॉलिन्स ही त्रिमूर्ती पृथ्वीवर सुखरूप परतली. त्यांचे जगाने जोरदार स्वागत केले. हे चांद्रवीर आपल्याकडे आले तेव्हा मुंबईत चंद्रासारखे स्टेज उभारून त्यांचा सत्कार झाल्याचे आठवते.

‘अपोलो-11’ च्या या मोहिमेसाठी 54 वर्षांपूर्वी अमेरिकेने 25 अब्ज डॉलर खर्च केले होते. ‘सॅटर्न-5’ या रॉकेटवरून चंद्राकडे गेलेल्या ‘अपोलो-11’ चे वजन 49 हजार 735 किलो होते, तर चंद्रावर उतरलेल्या ‘इगल’चे वजन 4,932 किलो होते. अर्थातच यासाठी प्रचंड इंधन लागलं आणि खर्चही बेसुमार वाढला, परंतु तो अमेरिकेने ‘प्रतिष्ठs’चा प्रश्न केला असल्याने एवढी ‘किंमत’ मोजणे भागच होते. अर्थात चांद्रविजय हे संशोधकांचं अपूर्व यश होतं, याविषयी दुमत असल्याचं कारण नाही. आपण हे फक्त 615 कोटींत साध्य केलंय. याउलट आपल्या चांद्रमोहिमा आपल्याला परवडतील अशाच काटकसरीच्या आखणे गरजेचे होते. यानाचं ‘पे-लोड’ किंवा त्यावरचा चंद्रावर उतरणारा भाग कमी वजनाचा असेल तर रॉकेट आणि इंधनाचा खर्च कमी होतो. त्याशिवाय पृथ्वी आणि चंद्राच्या अधिक परिक्रमा करून त्यांच्या गुरुत्वाकर्षणाचा वापर करत यानाची गती अधिक किंवा कमी करण्याचं जे तंत्रज्ञान जगात पूर्वीही वापरलं गेलं होतं, त्यामुळे मोहिमेचा वेळ वाढला तरी खर्चात खूपच बचत होणार होती.

म्हणूनच आपण ‘गोफणगती’ किंवा ‘स्लिंग शॉट’ असं ओळखलं जाणारं, परंतु वैज्ञानिक भाषेत ग्रॅव्हिटी ऑसिस्ट म्हणजे पृथ्वी-चंद्राच्या गुरुत्वाकर्षण सहाय्याने यानाचा वेग वाढवण्याचं तंत्र ‘चांद्रयान-1’पासूनच वापरलं. पृथ्वीला अनेक फेऱया मारून यान जेव्हा पृथ्वीजवळच्या कक्षेत येईल तेव्हा ‘बूस्टर’द्वारे त्याचा वेग वाढवून त्याची कक्षा बदलत बदलत ते पृथ्वीच्या वातावरणाबाहेर सुमारे 3 लाख 57 हजार किलोमीटर अंतरावर, चंद्र तुलनेने पृथ्वीजवळ असताना तिथे धाडायचे आणि पुन्हा चांद्रकक्षेत याच पद्धतीने वेग कमी करत उतरवायचे हा ‘ग्रॅव्हिटी ऑसिस्ट’चा प्रयोग. प्रथमतः तो रशियाने ‘ल्युना-2’ या यानासाठी 1959 मध्ये केला होता. नंतर सूर्यमालेबाहेर गेलेली व्हॉएजरसारखी यानं गुरू, शनीला परिक्रमा न करता, पण त्यांच्या जवळून जाताना (त्याला ‘फ्लायबाय’ म्हणतात) त्यांच्या गुरुत्वाकर्षणाने गती वाढवून पुढे न्यायची हे तंत्र वापरले गेले. अशा ‘स्लिंग-शॉट’मुळे चांद्रयानं चंद्रावर बऱयाच दिवसांनी पोहोचत असली तरी खर्च वाचवून मोठय़ा काwशल्यानं आपण हे यश मिळवतो हे महत्त्वाचं.

[email protected]