प्रासंगिक – मराठी चित्रपटांचा पहिला सुपरस्टार! 

>> प्रिया भोसले

काही  नावे सिनेइतिहासाच्या पानावर आली की, त्याचं महत्त्व वाढतं. त्या पानाला शोभा येते. तसंही इतिहास हा बहुतांशी मराठी  माणसाच्या कर्तृत्वाने झळाळलेलाच आहे. मग तो सिनेसृष्टीचाचा इतिहास का असे ना ! चित्रपटसृष्टीचे जनकच दादासाहेब फाळके म्हटल्यावर त्यांच्या  सिने फॅक्टरीत मानाचं पान मिळवणारी मराठी नावे सामील होतच आली आहेत. या यादीत 1960 च्या दशकात  इतिहासाच्या पानावर आपली मोहोर उमटवणारे होते…डॉ. काशीनाथ घाणेकर !

डॉ.काशीनाथ घाणेकरांची नाटके दोन पिढय़ांनी पाहिली, त्यांचा अभिनय पाहून त्यांच्यावर प्रेम केलं आणि नंतरच्या पिढीने त्या दोन पिढय़ांनी वर्णन केलेल्या घाणेकरांच्या आठवणींवर प्रेम केलं. मोजकीच नाटकं आणि मोजक्याच चित्रपटांतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा हा कलाकार. अभिनय असा की, माणूस मंत्रमुग्ध होऊन प्रेमात पडेल. साध्या कृष्णधवल चित्रपटातही समोरच्याच्या काळजाचा ठाव घेणारे ते निळे डोळे…मराठी चित्रपटसृष्टीचा अनभिषिक्त सम्राटच!

1963चा काळ, सिनेमांना सुगीचे दिवस आले होते. लोकांचा ओढा हिंदी चित्रपटांकडे वाढल्यामुळे नाटय़सृष्टीला त्याचा फटका बसला होता. अशात संभाजीराजांबद्दल जी पूर्वग्रहदूषित मतं होती, त्या मतांना छेद देणाऱ्या कानेटकरांच्या ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ नाटकात संभाजीराजांची भूमिका डॉक्टरांनी नुसती साकारली नाही, तर ते ती भूमिका अक्षरशः जगले. इतकं जीव तोडून काम केल्यावर दर्दी मराठी माणसाची पावलं पुन्हा एकदा नाटकांकडे वळली. रंगभूमीचे खडतर दिवस संपले आणि हे घडवून आणलं सुपरस्टार काशीनाथ घाणेकर यांनी. प्रेक्षकांना संभाजीराजांचं आयुष्य ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवता आलं ते कानेटकरांच्या लेखणीने आणि घाणेकरांच्या अभिनयाने. याच द्वयीचं पुढचं नाटक ‘अश्रूंची झाली फुले’ही यशस्वी झालं आणि घाणेकरांचं पुन्हा एकदा नामकरण झालं ‘लाल्या’. त्याचा रिमेक असलेल्या अनिल कपूरच्या ‘मशाल’ चित्रपटात घाणेकरांचं प्रसिद्ध वाक्य ‘एकदम कडेक्क’…‘एकदम झकास’ म्हणून प्रसिद्ध झालं.

मराठी नाटकात काम करत असताना घाणेकरांचं मराठी चित्रपटातही प्रस्थ वाढत होतं. निळ्या डोळ्यांमुळे भालजी पेंढारकरांच्या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका मिळाली नाही, पण भोळ्या आणि शूर भाव्याचा रोल मिळाला. त्या भूमिकेचं आणि ‘शूर आम्ही सरदार आम्हाला’ गाण्याचं मग घाणेकरांनी सोनं करणं स्वाभाविकच होतं. त्यानंतर आलेला राजदत्त यांचा ‘मधुचंद्र’ आणि राजा परांजपे यांच्या ‘पाठलाग’ या चित्रपटांतून अधिकृतपणे नायक म्हणून एंट्री घेतली आणि मराठी सिनेसृष्टीला देखणा नायक मिळाला. निळ्या बोलक्या डोळ्यांतली ती मधाळ नजर हे त्यांच्या चेहऱ्यावर फिदा व्हावं, असं फार क्वचित दिसणारं मिश्रण !

नाटकांइतकं प्रत्येक चित्रपटात समरसून अभिनय करावा ते घाणेकरांनी मग तो ‘मधुचंद्र’ असो, ‘गारंबीचा बापू’ असो किंवा ‘हा खेळ सावल्यांचा’, सिनेमातील एकेक दृष्य शंभर नंबरी अभिनयाचा आविष्कारच ! रंगभूमीवर काम केल्यामुळे शब्दांवर हुकमत, हावभावातले  बारकावे एकदम लाजवाब !

‘रायगडाला जेव्हा जाग येते’मधले करारी, हळवे संभाजीराजे, ‘अश्रूंची झाली फुले’मधला बेफिकीर ‘लाल्या’ आणि ‘गारंबीचा बापू’मधल्या बंडखोर, निर्मळ मनाच्या बापूची भूमिका विशेष गाजली. राजा ठाकुरांच्या ‘एकटी’ चित्रपटातला, आईसाठी तडफडणारा मधू… केवळ त्या भूमिकेत घाणेकर होते म्हणून ती भूमिका नकारात्मक वाटली नाही, हे विशेष. मराठीतला पहिला गूढपट ‘पाठलाग’ आणि ‘हा खेळ सावल्यांचा’सारख्या नायिकाप्रधान चित्रपटातही डॉक्टर घाणेकरांची छाप पूर्ण पिक्चरभर दिसते.

घाणेकरांच्या नाटकांचं कुठल्याही प्रकारचं संकलन झालं नाही. त्यामुळे फक्त चित्रपटांवर समाधान मानावे लागते, परंतु त्यामध्येही त्यांचा अभिनय आणि देखणं रूप पाहायला मिळतं हे  प्रेक्षकाचं नशीबच म्हणावं लागेल. ज्यांनी प्रत्यक्ष त्यांचा अभिनय पाहिला ते तर घाणेकरांच्या प्रेमात आहेतच, पण ज्यांनी त्यांच्या अभिनयाबद्दल फक्त ऐकलयं ती पिढीही त्यांच्या प्रेमात आहे. जुन्या चित्रपटांतून, नाटकांच्या ऐकीव माहितीतून आणि श्रीमती कांचन घाणेकर यांच्या पुस्तकातून त्यांना समजून घेऊन त्यांच्यावर प्रेम केलं. रंगभूमीला सुपरस्टार शब्दाची, टाळीच्या नादाची, पहिल्या शिट्टीची ओळख करून देणाऱ्या डॉ.काशीनाथ घाणेकरांचा 2 मार्च  स्मृतिदिन. पुढच्या पिढीसाठी अभिनयाचा आदर्श घालून देणाऱ्या डॉक्टरांना मानाचा मुजरा !