आशियातील नंदनवन अनुभवा! ट्युलिप गार्डन पर्यटकांसाठी खुले

जम्मू-कश्मीरमधील दल सरोवराच्या किनाऱ्यावर असलेले आशियातील सर्वात मोठे टय़ूलिप गार्डन शनिवारपासून पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. हे गार्डन भल्यामोठय़ा डोंगराळ भागातील 55 हेक्टर क्षेत्रात पसरलेले आहे. या गार्डनमध्ये 73 प्रकारचे जवळपास 17 लाखांहून अधिक टय़ूलिप उमलले आहेत. यात पाच नव्या प्रकारची टय़ूलिपची फुले उमलणार आहेत. तसेच ही सर्वांना पाहता येतील. गेल्या वर्षी 3.65 लाख पर्यटकांनी या गार्डनला भेट दिली होती. मात्र यावर्षी हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

टय़ूलिप गार्डन उघडण्याआधी कश्मीरचे विभागीय आयुक्त विजय कुमार बिधुरी यांनी टयूलिप गार्डनमधील व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावली होती. आधी सिराज बाग म्हणून प्रसिद्ध असलेल्या या भागात तत्कालीन मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी 2008 मध्ये टय़ूलिप गार्डन सुरू केले होते. आशियातील सर्वात मोठय़ा टय़ूलिप गार्डनचा मान या गार्डनला मिळाला. कश्मीर खोऱयातील पर्यटनाच्या दृष्टीने टयूलिप गार्डन खूप महत्त्वाचे आहे. दरवर्षी लाखो लोक देशभरातूनच नाही तर परदेशातूनही पृथ्वीवरील हे नंदनवन अनुभवण्यासाठी कश्मीरमध्ये येतात.

– टय़ूलिप गार्डन हे सकाळी 8 ते रात्री 7 वाजेपर्यंत खुले राहील.
– प्रौढ व्यक्तीसाठी 60 रुपये, मुलांना 25 रुपये तिकीट आहे.
– एअरपोर्टपासून 22 किमी, श्रीनगर रेल्वे स्टेशनपासून 18 किमी, श्रीनगरच्या लालचौकपासून 8 किमी अंतरावर आहे.