पालकमंत्रीच राहा; मालक बनू नका!

संगमनेर तालुक्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर दहशत करण्यापेक्षा दुष्काळाकडे गांभीर्याने बघा. दहशत करून संगमनेरचा विकास तुम्ही रोखू शकत नाही. थोडे लक्ष राहाता तालुक्यातही घाला. तेथील जनतेला लोकप्रतिनिधी म्हणून आपली अधिक आवश्यकता आहे, असा सल्ला देत ‘तुम्ही पालकमंत्री म्हणून राहा, मालक असल्यासारखे वागू नका’, असा हल्लाबोल आमदार बाळासाहेब थोरात यांनी नाव न घेता पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर केला आहे.

थोरात म्हणाले, पालकमंत्री पालकाची भूमिका विसरून मालकाच्या भूमिकेत आलेले दिसतात. संगमनेरमधील अधिकारी आणि विकासकामे पूर्णत्वाकडे नेणाऱ्या कंत्राटदारांना धमकी दिली जात आहे.  संगमनेरचा विकास बघवत नसल्याने त्यांचा राग समजू शकतो, असा टोलाही थोरातांनी लगावला.दरम्यान, टँकरच्या संख्येवरून दुष्काळाचे मोजमाप करणाऱ्या पालकमंत्र्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते.  दुष्काळ ही राजकारण करण्याची जागा नाही. मात्र, दुर्दैवाने पालकमंत्री अशाप्रकारे वागताना दिसतात, असा टोलाही आमदार थोरात यांनी लगावला.