‘बेस्ट’च्या एक हजार गाड्या डेपोतच; प्रवाशांचे मेगा हाल, कंत्राटी कामगारांचे ‘काम बंद’ आंदोलन

वारंवार मागणी करूनही प्रलंबित मागण्या पूर्ण होत नसल्यामुळे ‘बेस्ट’च्या कंत्राटी कामगारांनी ‘काम बंद’ आंदोलन केल्याने तीन हजारपैकी एक हजार बस डेपोतच उभ्या राहिल्या. बारा डेपोंमध्ये हे आंदोलन झाल्यामुळे सकाळी कामावर जाणाऱया चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले. प्रत्येक बस स्टॉपवर लांबच लांब रांगा लागल्या. सलग दुसऱ्या दिवशी संपात सहभागी होणाऱया कर्मचाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड पडला. दरम्यान, मागण्या पूर्ण करण्याबाबत ‘बेस्ट’ प्रशासनाकडून लेखी आश्वासन देण्यात आले नसल्याने आंदोलन उद्यादेखील सुरूच राहणार आहे.

कंत्राटी कामगारांनी पगारवाढ, डय़ुटीचे वेळापत्रक सुधारणा, मोफत बेस्ट बस प्रवास आदी मागण्या मान्य करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात येते, मात्र याची पूर्तता केली जात नाही. त्यामुळे बुधवारपासून सुरू असलेले ‘काम बंद’ आंदोलन शुक्रवारीही सुरूच ठेवण्यावर पंत्राटी कामगार ठाम आहेत. यामध्ये कंत्राटी कंपनी मातेश्वरी, डागा ग्रुप, हंसा, टाटा पंपनी, ओलेक्ट्रा स्विच मोबॅलिटी या पंत्राटी पंपनीच्या 1,671 बसेसपैकी फक्त 662 बसेस गुरुवारी प्रवाशांच्या सेवेत रस्त्यावर धावल्या. तर 1009 बस आगारात उभ्या राहिल्याने बेस्ट प्रवाशांचे सलग दुसऱ्या दिवशी मेगा हाल झाले. दरम्यान, संपकरी पंत्राटी कामगारांच्या पंपन्यांवर पंत्राटाच्या अटीशर्तीनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती बेस्ट उपक्रमाकडून देण्यात आली.

25 हजार पगार द्या!

वाढत्या महागाईमुळे 18 हजार रुपये पगार 25 हजार रुपये करण्यात यावा, बेस्ट उपक्रमाच्या कायमस्वरूपी कामगारांप्रमाणे कंत्राटी कामगारांनाही बेस्ट बसच्या मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावी आदी मागण्या कंत्राटी कामगारांकडून करण्यात येत आहेत.

या आगारातील बस बंद

वरळी ः 53, प्रतीक्षा नगर ः 76, आणिक ः 82, धारावी ः 72, देवनार ः 61, शिवाजी नगर ः 79, घाटकोपर ः 82, मुलुंड ः 91, मजास ः 97, सांताक्रुझ ः 85, गोराई ः 70 व मागाठाणे ः 59.