नितेश राणे यांची अटक टाळण्यासाठी धावाधाव

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्याबाबत बदनामीकारक विधाने करणारे भाजप आमदार नितेश राणे यांनी अटक टाळण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अब्रुनुकसानीच्या खटल्यात माझगाव न्यायालयाने नितेश राणेंविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे. त्यामुळे अटकेच्या भीतीने नितेश राणे यांनी वॉरंटला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

बदनामीकारक विधाने केल्याप्रकरणी नितेश राणेंविरुद्ध शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी अॅड. मनोज पिंगळे यांच्यामार्फत माझगाव दंडाधिकारी न्यायालयात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला आहे. या प्रकरणात आधी समन्स व नंतर जामीनपात्र वॉरंट बजावल्यानंतरही नितेश राणे न्यायालयात फिरकले नाहीत. अखेर न्यायालयाने त्यांना अजामीनपात्र वॉरंटचा दणका दिला आहे. या वॉरंटमुळे राणेंनी उच्च न्यायालयात फौजदारी रिट याचिका दाखल केली आहे. मी कधीही फरार झालेलो नाही. तसेच दंडाधिकारी न्यायालयाने जारी केलेले समन्स वा वॉरंट टाळण्यासाठी लपून राहिलेलो नाही, असे नमूद करीत राणेंनी वॉरंटचा आदेश रद्द करण्याची विनंती याचिकेतून केली आहे.

सत्र न्यायालयाने दिलासा नाकारला

अब्रुनुकसानीचा खटला चालवण्याबाबत माझगाव दंडाधिकारी न्यायालयाने दिलेल्या आदेशाला नितेश राणेंनी सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे. मंगळवारी झालेल्या सुनावणीवेळी राणेंच्या वकिलांनी दोषमुक्ततेसाठी युक्तिवाद केला. त्यावर अॅड. मनोज पिंगळे यांनी जोरदार आक्षेप घेतला. त्याची गंभीर दखल घेत न्यायाधीश राहुल रोकडे यांनी माझगाव न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देण्यास नकार दिला. याप्रकरणी 7 मार्चला पुढील सुनावणी होणार आहे.