आणि अजितदादा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसले; शिंदेंच्या अनुपस्थितीचा फायदा

मुंबई येथे मनोरा आमदार निवासाच्या भूमिपूजनावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीचा गैरफायदा घेतला. त्यांनी चक्क मुख्यमंत्र्यांची खुर्ची बळकावली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यामध्ये अजित पवारांची मदत केली. या घटनेची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली.

नरिमन पॉइंट येथे नवे मनोरा आमदार निवास उभारले जाणार आहे. त्याचे भूमिपूजन आज झाले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, उपसभापती नीलम गोऱहे आणि इतर आमदार उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या कार्यक्रमाला येऊ शकले नव्हते. यावेळी व्यासपीठावर अजित पवार यांची खुर्ची नीलम गोऱहे आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मधोमध होती. परंतु मुख्यमंत्र्यांची खुर्ची रिकामी असल्याने राहुल नार्वेकर यांनी अजित पवार यांना तिथे बसण्यास सांगितले. तत्पूर्वी, नार्वेकर यांनी त्या खुर्चीवरील मुख्यमंत्र्यांच्या नावाचा स्टीकर काढून टाकला. दरम्यान, या कार्यक्रमानंतर नार्वेकर यांना विचारले असता आजच्या शुभदिनी अशा वाईट चर्चा करू नका, असे उत्तर त्यांनी दिले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

मुख्यमंत्र्यांना ताप

मिंधे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीचे कारण यावेळी सांगितले. अंगात ताप आणि कणकण असल्याने मुख्यमंत्री आले नाहीत. त्यामुळे त्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना कार्यक्रम उरकून घेण्यास सांगितले, असे गोगावले म्हणाले. अजित पवार थेट मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसले त्यावर हे सर्व अनावधानाने घडले, यात काही गडबड नाही, असेही ते म्हणाले.

आमदारांना मिळणार एक हजार चौरस फुटाचा फ्लॅट

मनोरा आमदार निवासात 40 आणि 28 मजल्याच्या दोन इमारती बांधण्यात येणार आहेत. दोन्ही इमारतींत प्रत्येक फ्लॅट एक हजार चौरस मीटरचा असेल. या इमारतींसाठी 1300 कोटी रुपये खर्च येणार आहे.