भाजपला आदिवासींच्या जमिनी अदानींना द्यायच्यात, राहुल गांधींचा राजस्थानमध्ये हल्लाबोल

भाजप आदिवासींना आदिवासी नाही तर वनवासी संबोधते. हा आदिवासी समाजाचा आणि भारत मातेचा अपमान आहे. भाजपला आदिवासींच्या जमिनी, जंगले ताब्यात घेऊन अदानीसारख्या उद्योजकांच्या घशात घालायची आहेत, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी राजस्थानमधील सभेत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. जागतिक आदिवासी दिनाच्या पार्श्वभूमीवर मानगढ धाम येथून काँग्रेसने विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजवले

राहुल गांधी यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच आदिवासी दिनानिमित्त उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, हा संपूर्ण देश तुमचा आहे. तुम्ही यश प्राप्त करावे असे आम्हाला वाटते. तुमची मुले महाविद्यालयात जावीत, व्यवसाय करावा, त्यांना प्रत्येक क्षेत्रात संधी मिळावी असे आम्हाला वाटते; परंतु भाजप आणि आरएसएस यांना तुम्ही जंगलातच राहावे असे वाटते. तुमची मुले शिक्षण घेऊन पुढे जावीत आणि व्यावसायिक, डॉक्टर किंवा प्रोफेसर बनावीत अशी त्यांची इच्छा नाही. त्यांना तुमच्यावर केवळ आदिवासी असल्याचाच शिक्का मारायचा आहे, असा घणाघातही राहुल गांधी यांनी यावेळी केला.

आम्ही आदिवासी विधेयक आणले

हे जंगल हळूहळू संपवण्याचा घाट भाजपने घातला आहे. हे जंगल नष्ट करून तुम्हाची वणवण करण्याची त्यांची इच्छा आहे. आम्ही जंगलासाठी कायदा आणला, आदिवासी विधेयक आणले. आम्ही तुम्हाला दिलेले अधिकार मोदी सरकारने एकामागोमाग रद्द केले, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला.

इतिहास कुणीच बदलू शकत नाही. सत्य हेच आहे की, ही जमीन आदिवासींची होती. तुम्हाला तुमचे अधिकार मिळायलाच हवेत, कोणतीही स्वप्ने पाहण्याचा अधिकार मिळायला हवा.

राहुल गांधी, काँग्रेस नेते, खासदार

मोदींना मणिपूर पेटतंच ठेवायचं आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मनात आणलं तर ते मणिपूरमधील वणवा लष्कर पाठवून दोन ते तीन दिवसांत विझवू शकतात; पण त्यांना मणिपूर पेटतंच ठेवायचं आहे, असा तिखट हल्ला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी येथे केला. भाजपाच्या विचारधारेमुळेच मणिपूरमध्ये भडका उडाला आहे. तीन महिने मणिपूर धगधगत आहे. असं वाटतंय की मणिपूर भारताचा भाग नाहीय, तिथे राज्यच उरलं नाहीय… लोकांना, मुलांना मारलं जातंय, महिलांवर अत्याचार सुरू आहेत, अशी वेदना त्यांनी व्यक्त केली.