‘एकशे बावन’कुळे! भाजप 152 जागा जिंकेल, बावनकुळेंचा दावा

लोकसभेबरोबरच विधानसभा निवडणुकांची जोरदार तयारी भाजपने आतापासूनच सुरू केली आहे. महायुती म्हणून 2024च्या निवडणुकीला सामोरे जाताना विधानसभेच्या 152 जागा लढवण्याची घोषणा प्रदेश अध्यक्ष बावनकुळे यांनी केली. भाजपने थेट 152 प्लसचा नारा दिल्याने मित्र पक्ष असणाऱया शिंदे आणि अजित पवार गटाचे काय होणार याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी महाविजय 2024 कार्यशाळेचे आयोजन भिवंडी इथे करण्यात आले होते. या वेळी विधानसभेला 152पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे तर लोकसभेला देशात 350हून अधिक आणि महाराष्ट्रात 45पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे भाजपचे लक्ष्य असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. आगामी निवडणुकांत आम्ही राज्याच्या दृष्टीने गणिते आखली आहेत. त्यानुसार सर्वच निवडणुकांत भाजप नंबर एक असेल, असा दावा करतानाच महाराष्ट्रात महायुती म्हणून विधानसभेच्या 206पेक्षा अधिक जागा निवडून येतील, असा दावा बावनकुळे यांनी केला.

  • भाजपसोबत महायुतीत शिंदे गट, अजित पवार गट, रिपाइं आठवले गट, राष्ट्रीय समाज पक्ष, रयत क्रांती संघटना हे पक्ष आहेत.
  • विधानसभेच्या 288पैकी 152 जागा भाजपने लढवल्यास मित्रपक्षांच्या वाटय़ाला केवळ 126 जागा येण्याची शक्यता आहे. भाजपला 10 अपक्षांचा पाठिंबा आहे.
  • शिंदे गटाचे अपक्षांसह 50 आमदार आहेत तर अजित पवार गटाकडे 40पेक्षा जास्त आमदार आहेत. याचा अर्थ दोन्ही गटांचे जेवढे आमदार तेवढय़ाच जागा पदरात पडण्याची शक्यता आहे.
  • रामदास आठवले, महादेव जानकर, सदाभाऊ खोत यांनीही काही जागांची मागणी केलीय. त्यामुळे भाजपचं मिशन 152चे गणित कसे जुळवणार हा कळीचा मुद्दा आहे. त्यावरून येत्या काळात वाद पेटण्याची चिन्हे आहेत.