जानेवारी महिन्यात भाजपची पहिली यादी जाहीर होणार? राजनाथ सिंहांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता

2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजप जानेवारी महिन्याच्या शेवटी आपली पहिली यादी जाहीर करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. वयाची सत्ती पूर्ण केलेल्या नेत्यांना यंदा भाजप तिकीट देणार नसल्याची चर्चा असून असे झाल्यास संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचेही तिकीट कापले जाईल. राजनाथ सिंह यांच्यासोबतच 24 विद्यमान खासदारांचे तिकीटही कापले जाईल कारण त्यांनीही वयाची सत्तरी गाठली आहे. तरुण आणि महिला यांना तिकीट वाटपामध्ये अधिक स्थान देण्यात येईल असे कळते आहे. 2019 च्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा भाजपने अधिक जागा लढायचे ठरवले आहे. गेल्या निवडणुकीत भाजपने 437 जागा लढल्या होत्या.

भाजप पहिल्या टप्प्यात 150 ते 160 उमेदवारांची नावे घोषित करण्याची शक्यता आहे. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक असून यामध्ये निवडणुकीसाठीची नियमाावली जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. कोणत्याही विद्यमान खासदाराचे तिकीट कापले जात असताना फार नाराजी निर्माण होणार नाही याची काळजी घेतली जात असल्याचे सांगण्यात येत आहे.

सध्याच्या लोकसभेमध्ये भाजपचे सत्तरी पार केलेले 56 खासदार आहेत. यामध्ये राजनाथ सिंह, व्हीके सिंह, राव इंद्रजित सिंह, श्रीपाद नाईक, अर्जुन राम मेघवाल, गिरीराज सिंग, राजेंद्र अग्रवाल, रविशंकर प्रसाद, एस एस अहलुवालिया, पीपी चौधरी, संतोष गंगवार, राधामोहन सिंग आणि जगदंबिका पाल यांचाही समावेश आहे. सत्तरी पार केलेल्या सगळ्याच नेत्यांची तिकीटे कापली जातील असे नाही तर वयासोबत अनुभवही पाहिला जाईल आणि पक्षासाठी झटणाऱ्यांचाही सन्मान ठेवला जाईल असे सांगितले जात आहे.

भाजपने 2019 मध्ये लोकसभेच्या 303 पेक्षा जास्त जागा जिंकल्या होत्या. त्यापेक्षाही अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य भाजपने डोळ्यासमोर ठेवले आहे. त्यासाठी जास्तीत जास्त जागांवर निवडणूक लढवण्याची रणनीती आखण्यात आली आहे. ज्या जागांवर कधीही विजय मिळवता आलेला नाही, त्या जागांवर यावेळी भाजपचे विशेष लक्ष आहे. निवडणुकीपूर्वी लोकसभेच्या जागांसाठीच्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यामागेही भाजपची एक भूमिका आहे. उमेदवार लवकर जाहीर करण्याचा भाजपला नुकत्यात झालेल्या विधानसभांच्या निवडणुकीत झाला होता.लोकसभा निवडणुकीसाठीही याचीच पुनरावृत्ती करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. उमेदवाराचे नाव लवकर जाहीर झाल्यास कमकुवत उमेदवारांना आपल्या मतदारसंघावर लक्ष्य केंद्रित करण्याची संधी मिळते असं नवभारत टाईम्सच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातमीत म्हटले आहे.

भाजपच्या राष्ट्रीय परिषदेमध्ये देशभरातील जिल्हा पातळीवरील नेत्यांना बोलावण्यात येणार आहे. गेल्या 10 वर्षांत भाजप सरकारने केलेल्या कामांचा आढावा या नेत्यांसमोर मांडण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या योजना, कामे गावागावात जाऊन पोहचवण्याची जबाबदारी या जिल्हा पातळीवरील नेत्यांकडे सोपवण्यात येईल.