मिंधेंची गोची, भाजप करू शकते रामटेक व नाशिक मतदारसंघावर दावा

लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्यामुळे सध्या सर्व पक्ष आपआपल्या उमेदवारांची चाचपणी करत आहेत. अशातच सध्या महायुतीत लोकसभेच्या जागावाटपावरून सध्या वाद होत असल्याचे समोर येत आहे. भाजपने मिंधेना अवघ्या 12 जागांची ऑफर दिली असल्याचे समजते. दरम्यान आता भाजप मिंधेंच्या ताब्यात असलेल्या रामटेक व नाशिक मतदारसंघावर देखील दावा करणार असल्याची चर्चा आहे.

नागपूर रामटेक मतदारसंघातून सध्या मिंधे गटाचे कृपाल तुमाने तर नाशिक मतदारसंघातून हेमंत गोडसे हे विद्यमान खासदार आहेत. या दोघांचीही उमेदवारी धोक्यात आली आहे. कारण भाजप या दोन्ही जागांवर दावा ठोकणार असल्याची चर्चा आहे.

रामटेक मतदारसंघाचे भाजप जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना रामटेकचा पुढचा खासदार भाजपचाच असेल असा दावा केला आहे. ”आम्ही जवळपास अडीच हजार गावांमध्ये फिरलो आहेत. कार्यकर्त्यांशी संवाद साधला. प्रत्येकाचं मत आहे की आता यावेळेस या मतदारसंघातून आम्हाला कमळावर निवडून आलेला हक्काचा खासदार पाहिजे. आमच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे. येणारा रामटेकचा खासदार कमळाचाच असेल असे मी दाव्याने सांगतो”, असे सुधाकर कोहळे यांनी सांगितले.

तर अशीच परिस्थिती नाशिक मतदारसंघात आहे. ”सध्या या मतदारसंघात भाजप उजवी आहे हे कुणीही सांगेल. त्यामुळे आम्ही या जागेवर दावा करणार आहोत, असे नाशिक मतदारसंघाचे भाजप लोकसभा प्रमुख केदार आहेर यांनी सांगितले.