वाचावे असे काही – माय नेम इज रेड

डॉ.धीरज कुलकर्णी

ओरहान पामुक हा आज जगभरात उत्तम लेखक म्हणून प्रसिद्ध आहे. तुर्की भाषेतील या लेखकाने जगभरातील समीक्षकांचे लक्ष वेधून घेतले ते त्याच्या ‘माय नेम इज रेड’ या कादंबरीमुळे.Benim adim kirmizi या तुर्कीश भाषेत 1998 मध्ये प्रकाशित कादंबरीचा 2001 मध्ये my name is red हा इंग्रजी अनुवाद प्रकाशित झाला. 2006 साली याला नोबेल पारितोषिक मिळाले आणि 2016 साली याचा साकेत प्रकाशन प्रकाशित, प्रसिद्ध मराठी लेखक गणेश विसपुते यांनी उत्कृष्ट मराठी अनुवाद केला.

मानवी आयुष्यातील कलेचे महत्त्व, परस्परसंबंधाची गुंतागुंत, इतिहास अशा अनेक पैलूंना ही कादंबरी कथेच्या ओघात स्पर्श करते. कादंबरीचे कथानक घडते 1591 सालात तत्कालीन तुर्कस्तानमध्ये. या काळात तिथे ऑटोमन सामाज्य होते. या 1591 सालाला अनेक अंगांनी महत्त्व आहे. एक म्हणजे या वर्षी कथेमध्ये सुलतानाने एक ग्रंथ तयार करण्याचा आदेश तेथील चित्रकारांना दिला आहे. हा तो काळ आहे, ज्या काळात ऑटोमन साम्राज्यातील कला, साहित्य आदी त्यांच्या उत्कर्षबिंदूवर होते. कलाकारांना मानसन्मान होता. ग्रंथांची सजावट करताना त्यासाठी चौकटीभोवती काढण्यात येणारी लघुचित्रे म्हणजे मिनिएचर कला संपूर्ण विकसित झालेली होती. राजाच्या रंगशाळेत अनेक कलावंत पदरी होते. या कलाकारांचे एक स्वतंत्र विश्व इथे दाखवण्यात आले आहे. त्यांच्यातील स्नेहभाव, वैर, स्पर्धा या गोष्टी लेखक सूक्ष्मपणे दाखवतो. ऑटोमन काळातील कलेवर धार्मिक गोष्टींचा वाढणारा प्रभाव आणि कलाकारांनी त्याविरोधात कसा संघर्ष केलाय हेही आपल्याला दिसते. अनेक पात्रांच्या प्रथमपुरुषी निवेदनातून कथा उलगडत जाते. या पात्रांची निवडही लेखकाने फार वैशिष्टय़पूर्ण केली आहे.

उदा. सुरुवातीच्या प्रकरणातच एक प्रेत बोलत आहे, ज्याचा खून झाला. अशाच प्रकारे झाड, नाणे, कुत्रा इतकेच नव्हे, मृत्यूही या कादंबरीत पात्र बनून येतात व कथा सांगतात. अर्थात असे असले तरी ही कथा मुख्यत्वेकरून मानवी संवेदना व मनोव्यापार यातील व्यामिश्रता दर्शवते.

ओरहान पामुकने या कादंबरीत केवळ निवेदनाची रूढ चौकट मोडली असे नाही, तर कादंबरीचा आकृतिबंध, कथनशैली यांच्यातही त्याने प्रयोग केलेले दिसून येतात. यातील चित्रकारांना स्वतच्या कलेबद्दल प्रेम, अभिमान आहे. त्यामुळे उच्च प्रतिची पुस्तके त्याकाळात तयार होऊ शकली. यासोबतच कादंबरीत, तुर्कस्तानमधील तत्कालीन समाज, त्याच्या चालीरीती, लोककथा, आहार याविषयीची माहितीही आपल्याला समजते. तुर्कस्तानमधील इस्तंबूल हे शहर यात मध्यवर्ती पात्र आहे. स्वत लेखकाचे बालपण येथेच गेले. त्यामुळे वाचकाचे बोट धरून इस्तंबूलची सफर घडवून आणावी तसे लेखन आपल्याला वाचायला मिळते. इस्तंबूलचा उल्लेख झाला आणि तिथल्या मांजरांचा उल्लेख झाला नाही हे कसे शक्य आहे. याही कादंबरीत मांजरांचा अनेक ठिकाणी उल्लेख होतो.

रंग माणसाच्या आयुष्याला नेहमीच नवा अर्थ देतात. यातील पात्रे आणि घटना या ठळकपणे समोर याव्यात म्हणून रंगांचा वापर केला आहे. एकच प्रसंग वेगवेगळय़ा पात्रांच्या तोंडून, रंगसंदर्भाने वाचणे एक वेगळीच अनुभूती देते. पामुक स्वत म्हणतो त्याप्रमाणे रंग असणे म्हणजे काय, तर रंग म्हणजे डोळय़ांचा स्पर्श, बहिऱयास संगीत आणि गूढ अंधकारात शब्दाप्रमाणे आहे. तुर्की पौराणिक कथांमध्ये 12 व्या शतकापर्यंत लाल रंगाचा उल्लेख किंवा वापर दिसत नाही. हा वापर पर्शियामधून नंतर तुर्कीमध्ये आला. यासंदर्भाने पाहू गेल्यास पामुकचा बंडखोरपणा आपल्याला दिसतो.

इस्लामी मूलतत्त्ववादी चित्रकलेकडे ज्या दृष्टीने पाहतात, त्यापेक्षा पामुकची दृष्टी भिन्न आहे. जरी हे एक प्रकारे बंड असले तरी त्यातून मानवी स्नेहसंबंध जपण्याचा संदेश मिळतो. यातील लाल रंग हा ठामपणा, घट्ट भावनिकतेशी नाते सांगतो. तसेच सहज लैंगिक भावना, गती, वैभव यांचेही तो प्रतीक आहे. युद्धभूमीवर झेंडय़ाला वापरलेला रक्तवर्ण हा शौर्याचे आणि युद्ध करायच्या इच्छेचे प्रतीक आहे. यातील पांढरा रंग स्वच्छता आणि पात्रांच्या पवित्र मनोदशा दर्शवतात. अशा दृष्टिकोनातून ही कादंबरी वाचल्यास अधिक आनंद मिळतो.