कॅनडियन शीख गायक शुभचा मुंबईतील कार्यक्रम रद्द

कॅनडाचा प्रसिद्ध गायक शुभनीत सिंह ऊर्फ शुभचा हिंदुस्थान दौरा रद्द करण्यात आला आहे. शुभवर खलिस्तान समर्थक असल्याचा आरोप आहे. काही दिवसांपूर्वी त्याने समाजमाध्यमांवर हिंदुस्थानविरोधी पोस्ट केली होती. शुभविरुद्ध हिंदुस्थानात विरोध वाढत असून आता मुंबईत होणारा त्याचा कॉन्सर्ट रद्द करण्यात आला आहे. खलिस्तानी समर्थक कॅनेडियन गायक शुभचा मुंबईत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या महिन्याच्या अखेरला मुंबईत एक मोठा कॉन्सर्ट होणार होता. परंतु देशभरात वाढता विरोध पाहून हा कॉन्सर्ट रद्द करण्यात आला आहे. या कॉन्सर्टला ‘बोट इंडिया’ स्पॉन्सर करणार होती. परंतु शुभवरून देशात वाढता विरोध पाहता स्पॉन्सरशिपला मागे घेतले आहे. बुक माय शो वरून ज्यांनी या कॉन्सर्टची तिकिटे खरेदी केली त्या सर्वांना शंभर टक्के रिफंड दिले जात आहे. दरम्यान, हिंदुस्थानी क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार विराट कोहलीने शुभला एक्सवरून अनफॉलो केले आहे.