जबरदस्ती बियर पाजून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, आरोपींवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

राजस्थानातील चुरू येथे एका 14 वर्षाच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करून तिची अश्लील छायाचित्रे काढल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलीने तिच्या आईसह पोलिसांत तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेबाबत महिला पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी रामचंद्र चेटिवाल यांनी सांगितले की, एक वर्षापूर्वी अल्पवयीन मुलीला घेऊन तिची आई परदेशात गेली होती. तिथे तिची ओळख मुकेश नावाच्या एका तरुणासोबत झाली. ओळखीनंतर मुकेश या अल्पवयीन मुलीसोबत सतत फोनवर गप्पा मारत असे. त्यानंतर एक दिवस तो या अल्पवयीन मुलीला घेऊन कॅफेत गेला. तिथे त्याने कॅफेच्या मालकाशी बोलून मुलीला जबरदस्ती बियर पाजून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. याचवेळी कॅफेच्या मालकाने या मुलीचे अश्लील फोटो काढले. तिला ब्लॅकमेल करून तिच्यावर अनेक वेळा सामूहिक बलात्कार केला. यादरम्यान पीडित मुलगी गरोदर राहिल्यामुळे आरोपी मुकेशने तिचा गर्भपात केला.

याबाबत पीडित मुलीने तिच्या आईसोबत स्थानिक पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सामूहिक बलात्कार आणि पोक्सो कायद्याअंतर्गत आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर पीडित मुलीला जबरदस्त मानसिक धक्का बसला आहे. त्यामुळे पोलीस तिचे समुपदेशन करत आहेत.

पीडित मुलीने दिलेली माहितीनुसार, महिला पोलिसांनी आरोपी मुकेश, जगदीश आणि त्यांच्या कुटुंबियांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर सर्वच आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.