विक्रोळी कन्नमवार नगरला मिळणार कम्युनिटी हॉल

विक्रोळी येथील कन्नमवार नगरसाठी कम्युनिटी हॉल दिला जाणार आहे, अशी माहिती म्हाडाने उच्च न्यायालयात दिली आहे. या हॉलचा वापर कोण करणार व कशासाठी केला जाईल, याचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश न्यायालयाने म्हाडाला दिले आहेत. न्या. एन. जमादार यांच्या खंडपीठासमोर म्हाडाचे वकील प्रकाश लाड यांनी ही माहिती दिली. त्याची नोंद करून घेत न्यायालयाने वरील आदेश दिले व ही सुनावणी 21 ऑगस्ट 2023 पर्यंत तहकूब केली.

कन्नमवार नगर येथे 29 इमारती आहेत. या इमारतीचे बांधकाम 1966 मध्ये झाले होते. आता या इमारतींचा पुनर्विकास सुरू आहे. येथील कम्युनिटी हॉलवरुन कन्नमवार नगर सोसायटी व म्हाडामध्ये वाद सुरू आहे. याची सुनावणी न्या. जमादार यांच्यासमोर सुरू आहे. त्यात म्हाडाचे निवासी कार्यकारी अभियंता प्रकाश सानप यांनी प्रतिज्ञापत्र केले आहे.

इस्टेट मॅनेजरने बांधकाम पाडण्याची धमकी दिली आहे, असा असोसिएशनचा दावा आहे. घर रिकामी करण्याची कार्यकारी अभियंत्याची नोटीस बेकायदा आहे, असेही असोसिएशनचे म्हणणे आहे. मात्र जागा रिकामी करुन इमारतीचा ताबा द्यावा जेणेकरुन पुनर्विकास करता येईल, असे म्हाडाचे म्हणणे असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे.

म्हाडाला 17 आणि 19 क्रमांक इमारतीचा तसेच कार्यालयीन इमारत 5 व 6 चा पुनर्विकास करायचा आहे. असोसिएशनच्या 1 ते 29 इमारती आहेत. यामध्ये 464 घरे आहेत.  यातील 26 इमारतींपैकी 20 इमारतींचा पुनर्विकास झाला आहे. इमारत क्रमांक 5 मधील कार्यालय सोसायटीला दिले होते. त्यांच्याकडून भाडे घेतले जात होते. मात्र त्याचा नोंदणीकृत करार झाला नव्हता.

  • या जागेचा खासगी कार्यक्रमांसाठी वापर केला जात होता. त्याद्वारे नफा कमावला जात होता. मुळात याची परवानगीच नव्हती, असे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे.
  • 17 आणि 19 क्रमांकाच्या इमारतीचा पुनर्विकास करण्यात येईल व तेथील रहिवाशांना घरे दिली जातील. तेथे कम्युनिटी हॉल दिला जाईल. ज्याचा वापर सोसायटी करू शकेल, असी माहिती प्रतिज्ञापत्रात देण्यात आली आहे.