जुने प्रकरण उकरून भाजपने काँग्रेसचा उमेदवार पळवला! सुरतेनंतर इंदूरमध्ये लोकशाहीवर दरोडा

पराभवाच्या भीतीने भाजपने ऐन निवडणुकीत दमदाटी करून पह्डापह्डीचे राजकारण चालवले आहे. सुरतेनंतर आता इंदूरमध्येही भाजपने काँग्रेसचा उमेदवार पळवला आहे. 17 वर्षे जुने प्रकरण उकरून काढत दबाव टाकून भाजपने काँग्रेसचे उमेदवार अक्षय बाम यांना फोडले आहे. बाम यांनी आज अचानक उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि लगेचच भाजपमध्ये प्रवेश केला. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीच भाजपने हे कारस्थान केले असून यानंतरही काहीच कारवाई होत नसेल तर लोकशाही धोक्यात आहे असे म्हणायचे नाही तर काय म्हणायचे, असा सवाल काँग्रेसने केला आहे.

इंदूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने अक्षय कांती बाम यांना उमेदवारी दिली होती. निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी येथे मतदान होणार आहे, मात्र आज बाम यांनी अचानक माघार घेतल्याने निवडणूक प्रक्रियेवरच अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. भाजपने बाम यांच्यावर दबाव आणून त्यांना माघार घेण्यास भाग पाडल्याचे आता उघड झाले आहे.

बाम भाजपच्या नजरकैदेत

बाम यांच्यावर दाखल जुन्या गुह्यातील कलमांमध्ये तीन दिवसांपूर्वीच खुनाचे कलम जोडण्यात आले होते. त्यानंतर अचानक बाम यांनी उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला. धक्कादायक म्हणजे बाम यांना भाजपकडून एकप्रकारे नजरपैदेतच ठेवण्यात आले होते. मध्य प्रदेशातील भाजपचे नेते पैलाश विजयवर्गीय यांनी त्यांचे विश्वासू आमदार रमेश मेंडोला सतत बाम यांच्यासोबत होते. अर्ज मागे घेतानाही मेंडोला बाम यांच्याबरोबर होते. इतकेच नव्हे तर विजयवर्गीय हेसुद्धा यादरम्यान निवडणूक अधिकारी कार्यालयाबाहेर थांबले होते. यानंतर मेंडोलांनी बाम यांना एका कारमध्ये घालून थेट भाजप कार्यालयात नेले. तिथे बाम यांना पक्षात प्रवेश देऊन त्याचे पह्टोही विजयवर्गीय यांनी एक्सवर शेअर केले.

काँग्रेसचे आरोप

असे प्रकार घडल्यानंतर हिंदुस्थानात लोकशाही धोक्यात आहे असे म्हणायचे नाही तर काय म्हणायचे, असा सवाल काँग्रेसने या घडामोडींनंतर केला. उघड उघड दबावाचे राजकारण केले जात आहे. उमेदवारांना धमकावून आपल्या पक्षात घेतले जात आहे. मग याला मुक्त आणि निष्पक्ष निवडणूक कशी म्हणणार, असा प्रश्न काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी केला.

पुढे काय…

काँग्रेस खजुराहो मतदारसंघाप्रमाणे येथेही काँग्रेस अपक्ष किंवा छोटय़ा पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा देऊ शकते. खजुराहोमध्ये इंडिया आघाडीच्या उमेदवाराचा अर्ज फेटाळण्यात आल्यावर काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकचे उमेदवार आर. बी. प्रजापती यांना पाठिंबा दिला आहे. आता ते भाजपचे उमेदवार व्ही. डी. शर्मा यांच्या विरोधात इंडिया आघाडीचे उमेदवार आहेत.

धमकावले, रात्रभर छळ केला!

अर्जांच्या छाननीदरम्यान भाजपच्या कायदा कक्षाने बाम यांच्या नामनिर्देशन फॉर्मवर 17 वर्षे जुन्या जमिनीच्या वादात खुनाचा प्रयत्न केल्याचे कलम 307 लावल्याचा उल्लेख न केल्याबद्दल आक्षेप घेतला होता. अधिकाऱयांनी तो आक्षेप फेटाळून लावला होता. उमेदवारी अर्ज दाखल केला त्याचदिवशी हे कलम जोडले गेल्याने त्यांचे नामांकन स्वीकारले होते, मात्र पद्धतशीर दबाव आणण्याची ती एक खेळी होती, असे सूत्रांनी सांगितले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जितू पटवारी म्हणाले, तीन दिवसांपूर्वी बाम यांच्यावरील जुन्या प्रकरणात कलम 307 वाढवण्यात आले होते. त्यांना घाबरवले, धमकी दिली, रात्रभर छळ केला आणि आज त्यांना माघार घ्यायला भाग पाडले गेले.