स्वत:ची ओळख निर्माण करा; शरद पवारांचे फोटो का वापरता? सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला फटकारले

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट झाल्यावरही राजकीय फायद्यासाठी शरद पवारांचे नाव आणि फोटो वापरणाऱया अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाने आज चांगलेच फटकारले. आता तुम्ही दोन स्वतंत्र गट आहात. त्यामुळे तुम्ही स्वतःची ओळख निर्माण करा, शरद पवारांचा फोटो का वापरता? यापुढे तुमच्या प्रचारासाठी त्याचा वापर करणार नाही अशी लेखी हमी द्या, असे न्यायालयाने बजावले. यावर शनिवारी आम्ही प्रतिज्ञापत्र सादर करू, असे अजित पवार गटाकडून स्पष्ट करण्यात आले. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने घडय़ाळ या निवडणूक चिन्हाऐवजी दुसऱया पर्यायाचाही विचार करा, असेही सुचवले. या प्रकरणाची पुढील सुनावणी 19 मार्च रोजी होणार आहे.

राष्ट्रवादीतील फुटीनंतर पेंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव आणि घडय़ाळ चिन्ह अजित पवार गटाला दिले आहे. या निर्णयाविरोधात शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी पक्षाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर न्यायमूर्ती सूर्य कांत आणि न्यायमूर्ती केव्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. या वेळी युक्तिवाद करताना ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी अजित पवार गटाकडून स्वतःच्या प्रचारासाठी बॅनर्सवर शरद पवारांचे फोटो आणि नावाचाही गैरवापर करण्यात येत असल्याकडे लक्ष वेधले. या वेळी सिंघवी यांनी छगन भुजबळ यांचे एक वक्तव्यही न्यायालयासमोर वाचून दाखवत मतदारांना आकर्षित करण्यासाठी कशा प्रकारे शरद पवारांचा फोटो व घडय़ाळ चिन्हाचा वापर होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. याची गंभीर दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने स्वतःच्या प्रचारासाठी बॅनर्सवर शरद पवारांच्या फोटोचा वापर करू नका, असे निर्देशच अजित पवार गटाला दिले.

सिंघवी काय म्हणाले…

सिंघवी यांनी निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला दिलेल्या घडय़ाळ चिन्हावर आक्षेप घेतला आणि पक्षात फूट पडल्यानंतर त्यांना नवीन चिन्ह द्यायला हवे होते, परंतु आम्हाला नवीन चिन्ह दिले. घडय़ाळ चिन्ह आणि शरद पवार अशी ओळख अतूटपणे जोडलेली आहे. त्यामुळे अजित पवार गटाने घडय़ाळाव्यतिरिक्त कोणतेही चिन्ह वापरावे, असा युक्तिवाद सिंघवी यांनी केला. त्याची दखल घेत न्यायालयाने अजित पवार गटाला वेगळे चिन्ह वापरण्याचा सल्ला सुनावणीदरम्यान दिला.

न्यायालय काय म्हणाले…

शरद पवार गटाकडे वेगळं चिन्ह आहे, तर अजित पवार गटही वेगळं चिन्ह घेऊन निवडणूक का लढवत नाही? जेणेकरून न्यायालयाच्या निकालाचा कोणताही परिणाम तुमच्यावर होणार नाही आणि तुमचं काम तुम्हाला विनासायास करता येईल. या सल्ल्यावर तुम्ही विचार करा, असेही न्यायालयाने नमूद केले.

न्यायालयात काय घडले…

तुम्ही त्यांचे फोटो का वापरत आहात? जर तुम्हाला स्वतःवर विश्वास आहे, तर मग तुमचे स्वतःचे फोटो वापरा, असे न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले.

त्यावर अजित पवार गटाकडून युक्तिवाद करणारे ज्येष्ठ वकील मनिंदर सिंग यांनी आमच्या पक्षाकडून त्यांचे फोटो वापरले जात नाहीत. काही त्रयस्थ सदस्यांनी कदाचित वापरला असावा. कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर टाकल्या जाणाऱया सर्व पोस्टवर नियंत्रण ठेवणं अशक्य असल्याचे सांगितले.

सिंग यांच्या युक्तिवादावर न्यायालयाने जर तुम्हाला कार्यकर्त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट नियंत्रित करणं शक्य होत नसेल, तर मग त्यासाठी कोण जबाबदार आहे? तुम्ही न्यायालयाला लेखी स्वरुपात हे सांगा की तुम्ही शरद पवारांचे फोटो वापरण्यापासून तुमच्या सर्व सदस्यांना थांबवाल.

आता तुम्ही दोन स्वतंत्र गट आहात. त्यामुळे तुम्ही फक्त तुमच्या ओळखीचाच वापर करा. तुम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय, मग त्यावर ठाम राहा. तुमच्या पक्षातील कार्यकर्त्यांना आवरणं हे तुमचं काम आहे, असे न्यायालयाने या वेळी नमूद केले. यावर सिंग यांनी अशी लेखी हमी देण्याचे मान्य केले.

घडय़ाळाऐवजी दुसऱया चिन्हाचा विचार करा

तुम्ही घडय़ाळ चिन्हाचा वापर न करता दुसऱया कुठल्या तरी चिन्हाचा वापर करा, असा सल्ला आम्ही तुम्हाला देत आहोत. निवडणूक आयोगाच्या आदेशाविरोधात न्यायालयासमोर याचिका आलेली आहे. जर आम्ही आयोगाचा निकाल रद्दबातल ठरवला आणि ऐन निवडणुकीच्या मध्यावर आमचा निकाल आला तर तुम्ही काय कराल, असा प्रश्न न्यायालयाने अजित पवार गटाला केला.