दापोलीत ‘दापोली प्रो गोविंदा पर्व 1’ चे आयोजन

दापोलीच्या सांस्कृतिक इतिहासात पहिल्यांदाच दापोली येथे यावर्षी श्री. देवी मरिआई प्रतिष्ठान तेरेवायंगणी पंचक्रोशी या रजिस्टर संस्थेने आणि दुर्वा स्पोर्ट व शौर्य टॉफिज यांनी 3 सप्टेंबरला दापोली प्रो गोविंदा पर्व 1 चे आयोजन केले आहे. प्रो गोविंदा पर्वाच्या थराराची अपुर्वाई प्रत्यक्ष पाहायला मिळणार आहे.

गोकुळाष्टमी अर्थात दहीहंडी या उत्सवात कोकणवासींयांच्या आनंदाला उत्साहाचे भरते येते. नारळी पौर्णिमा झाली की कोकणवासीयांना ख-याअर्थाने गोकुळाष्टमीचे वेध लागतात. अनेक गावात दहीहंडी फोडण्यासाठीच्या सरावासाठीचे थर लागतात. गावा गावातील गल्ली बोळात ढोलांच्या आवाजाचे कानात सुर घुमू लागतात. असा हा दहीहंडीचा उत्सव म्हणजे कोकणवासीयांच्या आनंदाची पर्वणीच आहे. दही हंडीचा हा उत्सव दापोलीतील प्रत्येक गावात साजरा करण्यात येतो. अनेक गावातील गोविंदा पथक हे मोठ मोठाले दही हंडी फोडण्यासाठीचे गोविंदाचे थर लावतात मात्र ते पाहण्यासाठी सिमितच लोक असतात. अशी दहीहंडी पथकांची कसरत सगळयांना मन मुराद पाहता यावी यासाठी दापोली तालूक्यातील श्री.देवी मरिआई प्रतिष्ठान तेरेवायंगणी पंचक्रोशी या रजिस्टर संस्थेने तसेच दुर्वा स्पोर्ट आणि शौर्य टॉफिज् यांनी दापोली शहरातील नर्सरीरोड येथील मराठा विदयामंदिरच्या प्रांगणात रविवारी 3 सप्टेंबरला सायंकाळी 4 वाजता दापोली प्रो गोविंदा पर्व 1 चे आयोजन केले आहे. यासाठी प्रथम पारितोषिक 10 हजार रूपये आणि मानाची गदा तसेच व्दितीय क्रमांकासाठी 5 हजार रूपये आणि सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सहभागी प्रत्येक गोविंदा पथकांना विशेष सन्मानचिन्ह दिले जाणार आहे.