हिंमत असेल तर निवडणुका घ्या, जनता ठरवेल कोण पात्र कोण अपात्र! उद्धव ठाकरेंचा आसुड कडाडला

आमदार अपात्रतेचा निर्णय लागेल तेव्हा लागेल पण हिंदुस्थानमध्ये सर्वोच्च न्यायालय म्हणून जे काही आहे त्याला हा लवाद जुमानत नसेल तर सर्वोच्च न्यायालयाचे अस्तित्व राहणार आहे की नाही? डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेचे अस्तित्व शिल्लक राहणार आहे की नाही? आणि सगळय़ात महत्त्वाचे म्हणजे अनेक क्रांतिकारकांनी, अनेक योद्धय़ांनी रक्त सांडून, बलिदान देऊन जी आपली भारतमाता स्वतंत्र केली, त्या भारतमातेची लोकशाही टिकणार की नाही?

एक वर्ष उलटले तरी अद्याप गद्दार आमदारांच्या अपात्रतेचा निकाल लागलेला नाही. तारीख पे तारीख सुरूच आहे. निर्णय जेव्हा लावायचा तेव्हा लावा. पण हिंमत असेल तर सर्व महानगरपालिकांसह लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका घेऊन दाखवा. जनताजनार्दनच ठरवेल कोण पात्र आणि कोण अपात्र, असे जाहीर आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सरकारला दिले. शिवसेनेचा दसरा मेळावा आज मोठय़ा जल्लोषात आणि पारंपरिक पद्धतीने शिवतीर्थावर  झाला. या वेळी लाखोंच्या गर्दीला संबोधित करताना मिंधे सरकार आणि भाजपवर उद्धव ठाकरे यांचा आसूड कडाडला. आमदार अपात्रता सुनावणीबरोबरच मराठा आरक्षण, धारावी पुनर्विकास, शेतकऱयांची पिळवणूक, आरोग्य यंत्रणेचे तीनतेरा अशा विविध मुद्दय़ांवरून उद्धव ठाकरे यांनी सरकारची अक्षरशः सालटी काढली. तपास यंत्रणांच्या माध्यमातून त्रास द्याल तर उद्या आमचे सरकार आल्यानंतर उलटे टांगल्याशिवाय राहणार नाही, असा खणखणीत इशाराही त्यांनी दिला.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी मुंबई-महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱयातून लाखो शिवसैनिक आणि शिवप्रेमी नागरिकांचा जनसागर शिवतीर्थावर उसळला होता. उद्धव ठाकरे यांनी विजयादशमीच्या शुभेच्छा देत त्या अलोट गर्दीला मार्गदर्शन केले. आपल्या 50 मिनिटांच्या तडाखेबंद भाषणात उद्धव ठाकरे यांनी चौफेर फटकेबाजी केली. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवानो, भगिणींनो आणि मातांनो… अशी साद घालत उद्धव ठाकरे यांनी भाषणाला सुरुवात केली. 57 वर्षे झाली तरीही शिवसेनेची दसरा मेळाव्याची परंपरा आपण मोडली नाही आणि यापुढेही मोडणार नाही, असे सांगतानाच, ज्यांनी मोडता घालण्याचा प्रयत्न केला त्यांना मोडीत काढून ही परंपरा अखंडपणे सुरू राहील, असा ठाम आत्मविश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

आमदार अपात्रता सुनावणीच्या मुद्दय़ावरून उद्धव ठाकरे यांनी यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर नामोल्लेख न करता हल्लाबोल केला. अपात्रतेचा निर्णय जेव्हा लावायचा तेव्हा लावा. 20 वर्षांनी, 50 वर्षांनी लावा. पण आज संपूर्ण देश आणि जग बघतेय. सर्वोच्च न्यायालयाला हा लवाद जुमानत नसेल, तर हिंदुस्थानात सर्वोच्च न्यायालयाचे अस्तित्व राहणार की नाही? बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना शिल्लक राहणार आहे की नाही? क्रांतिकारकांनी बलिदान देऊन स्वतंत्र केलेल्या भारतमातेची लोकशाही टिकणार की नाही? असा खणखणीत सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. ‘एक वर्षे उलटूनही अपात्रतेबाबत निर्णय झालेला नाही. तारीख पे तारीख. काय करायचे तेच कळत नाही. सर्वोच्च न्यायालयाने प्रत्येक वेळी लवादाचे कानफाट पह्डले. पण निर्लज्जम सदासुखी. कानफाट पह्डले तरी गाल चोळत सांगतात की वेळापत्रक सादर करू.’ अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली. जनतेने कोण अपात्र आहे हे ठरवून टाकले आहे आणि माझे तर असे म्हणणे आहे की, केसचा निकाल लागण्याआधी निवडणुका घेऊन दाखवा मग जनता जनार्दनच ठरवेल की कोण पात्र आणि कोण अपात्र? असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

आजोबा झाले तरी केस चालूच

अपात्रतेच्या निर्णयाला होत असलेल्या विलंबावरून उद्धव ठाकरे यांनी यावेळी एक विनोदही ऐकून दाखवला. ‘एकदा भर कोर्टात न्यायमूर्ती एका 20 वर्षांच्या मुलीची छेड काढल्याच्या प्रकरणाची सुनावणी घेत असतात. आरोपीच्या पिंजऱयात एक आजोबा काठी टेकत आले. न्यायाधीशांचे डोके फिरते. ते म्हणाले, तुम्हाला लाज वाटत नाही? आजोबा असूनही तुम्ही 20 वर्षांच्या मुलीची छेड काढता? त्यावर ते आजोबा म्हणतात, न्यायाधीश महाराज, ही घटना घडली तेव्हा मीही 20 वर्षांचाच होतो. इतकी वर्षं झाली, तरी केस चालूच आहे’, असे उद्धव ठाकरे यांनी सांगताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.

भाजपा जाते तिथे सत्यानाश करते

भाजपाच्या स्वार्थीपणावर बोट ठेवत उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, भाजपा किंवा जनसंघाचा कुठल्याही लढय़ाशी संबंध नव्हता. स्वातंत्र्यलढय़ात ते नव्हते. मराठवाडा मुक्तिसंग्रामात त्यांचे नाव ऐकले नाही. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही ते नव्हते. पण केव्हा एकत्र आले? संयुक्त महाराष्ट्र समितीत आले. कशासाठी आले? तर आयते अन्न शिजतेय, चला हात मारू म्हणून आले. सगळ्यात शेवटी आले आणि सर्वात आधी बाहेर पडले. जागा वाटपाचे भांडण त्यांनी त्या वेळी केले होते. विघ्नसंतोषीपण म्हणतात ते यालाच, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ते पुढे म्हणाले की, भाजपाने जनता पक्षाबरोबर युती केली होती तिथेही दुहेरी वाद निर्माण केला आणि तोडपह्ड केली. मग शिवसेनेबरोबर आले. कधी अकाली दलाबरोबर गेले. कधी नितीश कुमारांबरोबर गेले. गोव्यात मगो पक्षाबरोबर गेले. जिथे जाते तिथे ही अवलाद सत्यानाश करते. त्यामुळे भाजपापासून सावध राहण्याची गरज आहे, असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी दिला.

दुसऱ्याची घरे पेटवून पोळ्या भाजणे हेच भाजपचे धोरण

शिवसेनेचा भगवा आजही मानाने आणि डौलाने फडकतो आहे. त्या भगव्यातही भाजपाने दुही माजवली, अशी टीका करतानाच उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या या प्रवृत्तीची तुलना अहमदशाह अब्दालीशी केली. अब्दालीनेही हेच केले होते असे ते म्हणाले. ‘दुहीची बीजे पेरायची, भांडणे लावायची आणि खरे प्रश्न बाजूला सारायचे.’ तुमच्या चुली पेटवण्यापेक्षा आम्ही तुमची घरे पेटवतो आणि त्यावर आमची पोळी भाजतो हेच भाजपचे धोरण आहे आणि आता ते उघड उघड दिसतेय, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

आरक्षणाचा प्रश्न लोकसभेत सोडवा

गद्दार मिंधे सरकारमध्ये हिंमत असेल तर मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा, असे आव्हानही उद्धव ठाकरे यांनी दिले. हा प्रश्न लोकसभेत सोडवावा लागेल आणि संसदेला तो अधिकार आहे, असे ते म्हणाले. ऐन गणेशोत्सवात विशेष अधिवेशन घेतले जाते, बदल्यांच्या अधिकारांसाठी निर्णय वळवला जातो तसाच मराठा आणि धनगर समाजाला न्याय द्या, अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी केली.

शस्त्रपूजन, सरस्वतीला वंदन

दसरा मेळाव्यात संस्कृती-परंपरेनुसार शस्त्रपूजनही करण्यात आले. शिवाय सरस्वती मातेलाही पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले.

घराण्यांनाही परंपरा असते…

घराण्यांचीही परंपरा असते, संस्कार असतात असे सांगत उद्धव ठाकरे यांनी यावेळी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे उदाहरणही दिले. चंद्रचूड यांचे वडीलही सर्वेच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होते आणि कणखर, कडक होते, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

धारावी घशात घातली तर रस्त्यावर उतरू

अनेक जाती-धर्माच्या लोकांचे छोटे-मोठे अनेक व्यवसाय असलेली धारावी झोपडपट्टी पुनर्विकासाच्या नावाखाली मित्राच्या घशात घालण्याचा डाव आहे. यातून मिळणारा 150 एफएसआय दक्षिण मुंबईत वापरण्याचा डाव आहे. मात्र पुनर्विकासाच्या नावाखाली धारावी कुणाच्या घशात घालण्याचा प्रयत्न कराल तर रस्त्यावर उतरून लढा देऊ, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. या ठिकाणी सर्व सुविधा निर्माण करून गिरणी कामगारांना, पोलिसांनाही घरे द्यावीत, अशी मागणीही यावेळी त्यांनी केली. यामुळे मुंबईत मराठीचा ठसा आणखी ठळक होण्यासाठी मदत होणार असल्याचे ते म्हणाले.

मुंबई तोडेल त्याच्या शरीराचे तुकडे करू

जो कोणी मुंबईला महाराष्ट्रातून तोडेल त्याच्या शरीराचे तुकडे करू, जनता त्यांचे सरकार जाळून टाकेल, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला. मुंबई तोडता येत नाही म्हणून दुसऱ्या मार्गाने मुंबईला लुटण्याचे काम सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला. मुंबईतील कार्यालये बाहेर हलवली जात आहेत. बिल्डर असलेल्या पालकमंत्र्यांचे कार्यालय मात्र मुंबई महापालिकेत थाटले गेले आहे. मुंबई महापालिका असताना नीती आयोगाची एन्ट्री कशाला? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी सुरत लुटली होती मात्र आज सुरतमार्गे पळणारे महाराष्ट्राचे रक्षण काय करणार? त्यांनी आल्यावर आरेची जमीन मेट्रोला दिली. बुलेट ट्रेनला जागा दिली. ही बुलेट ट्रेन कुणाच्या फायद्याची आहे? मुंबई महापालिकेच्या ठेवींवर त्यांचा डोळा आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

पीएम केअर फंडाचीही चौकशी करा

कोरोनाकाळात ज्या महाराष्ट्राने अतुलनीय कामगिरी केली आता त्याची चौकशी केली जात आहे. मग चौकशीच करायची असेल तर एकटय़ा मुंबईची का, ठाणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूरचीही करा आणि अगदी पीएम केअर फंडाचीही करा, असेही उद्धव ठाकरे कडाडले. इथल्या भाजप नेत्यांनीही राज्याच्या निधीऐवजी पंतप्रधान निधीला पैसा दिला होता, हे कसले त्यांचे महाराष्ट्रप्रेम? असा सवालही त्यांनी केला.

भाजप म्हणजे कावळय़ाच्या विष्ठेतून तयार झालेला पिंपळ

भाजपची आजची अवस्था बिकट आहे. मध्यंतरी हनुमान चालिसाचे पेव फुटले होते. हिंमत असेल तर मणिपूरमध्ये जाऊन हनुमान चालिसा म्हणा, असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी ठणकावले. भाजप हा कावळ्याच्या विष्ठेतून झालेला पिंपळ आहे, गावोगावची गटारे मिळून झालेला समुद्र आहे, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली.

विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना घेराव घाला

शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे पैसे विमा कंपन्यांकडून मिळत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. नियमाप्रमाणे शेतकऱ्यांना विम्याच्या भरपाईची अग्रीम रक्कम मिळाली पाहिजे. परंतु तीसुद्धा दिली जात नाही. अशा विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना घेराव घाला असे आदेश उद्धव ठाकरे यांनी यावेळी शिवसैनिकांना दिले. शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहा असेही ते म्हणाले.

सीमेवर जवान मृत्यूमुखी पडत असताना गुजरातमध्ये भाजपकडून पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे फुलांनी स्वागत झाले. गरबा खेळला गेला. त्यांना शेव, फाफडा दिला गेला. ते बघून त्या क्रिकेटपटूंनाही वाटले असेल की आपण नेमके भारतात नाही तर भाजपात आलो अशी तोफ उद्धव ठाकरे यांनी पाकडय़ांना पायघडय़ा घालणाऱ्या भाजपवर डागली.

40 गेले, 140 निवडून येतील!

शिवसेना हा आता 57 वर्षांचा वटवृक्ष झाला आहे. असंख्य शिवसैनिकांच्या घामातून वटवृक्षाला फळे आली आहेत. काही फळे गळून गेली, तर काही फळे पळून गेली. आता राहिली आहेत ती घट्ट मुळे आहेत. 40 आमदार गेले तरी धीर सोडू नका, 140 निवडून आणण्याची हिंमत शिवसेनेच्या मनगटात आहे, असा टोला शिवसेना उपनेते नितीन बानुगडे-पाटील यांनी मिंध्यांना लगावला.

सरकारच्या अयोग्य धोरणामुळे पहिली ते बारावीच्या शिक्षणात तब्बल 83 लाख मुली शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर गेल्या आहेत. 20 पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्यात येत आहेत. मात्र पटसंख्या वाढवण्यासाठी कुठला अभ्यास गट नेमला जात नाही. असे असताना बीअरचा खप वाढवण्यासाठी मात्र अभ्यासगट नेमला जातो. ‘प्या बिअर आणि करा चिअर’ असेच सरकारचे धोरण असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. कोरोनासारख्या जिवघेण्या आजारात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र वाचला. आता तीच आरोग्य यंत्रणा आहे. तेच डॉक्टर, नर्स आहेत. मात्र शासकीय रुग्णालयात दररोज अनेक रुग्ण मरत आहेत. हा परिणाम नेतृत्व बदलाचा, सरकार बदलल्याचा असल्याचेही ते म्हणाले. बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. 35 हजार जागांसाठी तेवीस लाख अर्ज येतात. त्यामुळे या सरकारने महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला आहे, असा सवालही बानुगडे-पाटील यांनी केला.

सरकारच्या फसव्या धोरणांमुळे शेतकरी अडचणीत आला असून दररोज 6 ते 12 शेतकऱयांच्या आत्महत्या होत असल्याची आकडेवारी जाहीर करीत त्यांनी सरकारच्या जाहिरातबाजीचा अक्षरशः पर्दाफाश केला.

गद्दारांनी दिल्लीच्या पातशाहाची गुलामी करावी

गद्दारांनी दसरा मेळावा घेण्याचे सोंग करू नये, तर त्यांनी दिल्लीच्या पातशाहाची गुलामी करावी, दिल्लीची चाकरी करावी. इथे महाराष्ट्रात पुन्हा शिवसेनेचाच भगवा फडकणार आहे. तुम्हाला लवकरच घरी बसावे लागणार आहे, त्यासाठी निवडणुकांचीही गरज नाही, अशा शब्दात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मिंधे गटाचा समाचार घेतला.

महाराष्ट्राच्या विचारांशी गद्दारी करून तुम्ही सत्तेवर आले आहात. तेव्हापासून एकही राज्याच्या हिताचे काम केले नाही. माता-भगिनींच्या सुरक्षेचा प्रश्न चव्हाटय़ावर आला असून दररोज 70 मुली बेपत्ता होत आहेत. कायदा-सुव्यवस्था कुठेच दिसत नाही, रोजगार नाही, जे इथे येऊ इच्छित आहेत ते पळवून नेले जात आहेत, हे गद्दारांचे पाप असल्याचे दानवे यांनी ठणकावले.

सरकार आपल्या दारी अशी जाहिरात  केली जात आहे, पण सध्याची परिस्थिती पाहता सरकार आपल्या दारी नाही, तर यम आपल्या दारी असल्याची टीका दानवे यांनी केली. आज राज्यातील अनेक रुग्णालयांमध्ये औषधे, डॉक्टर नसल्याने मृत्यू होत आहेत. ही भयावह परिस्थिती आहे. हाफकिनने आतापर्यंत केवळ 50 कोटी रुपयांची औषधे खरेदी केली आहेत.  औषध खरेदीसाठी प्राधिकरण तयार केले असले तरी त्यांचीही आतापर्यंत एक रुपयाची खरेदी झालेली नाही. त्यामुळेच रूग्ण मरत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

इलेक्शनचा निघेल तेव्हा गद्दारांना जागा दाखवून देऊ

गद्दार आज आम्हीच बाळासाहेबांची शिवसेना असल्याचे सांगत दरोदार फिरत आहेत. पण खरी शिवसेना आणि शिवसैनिक शिवतीर्थावर आहे, हा निष्ठावंतांचा दसरा मेळावा आहे. शिवसेनाप्रमुख असताना दसरा मेळाव्यात आपण सर्वांनी त्यांना पक्षप्रमुख उद्धाव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासोबत राहण्याचे वचन दिले होते. म्हणूनच आज आणि उद्याही उद्धवसाहेबांसोबत आहोत, पण गद्दारांना त्याचा विसर पडला आहे, ते वेगळी भाषा बोलत असल्याची टीका उपनेत्या, माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली. मिंधे सरकार सध्या वेगवेगळे बहाणे करून निवडणुका पुढे ढकलत आहे. पण जेव्हा कधी इलेक्शनचा  ‘इ’ निघेल तेव्हा त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ, असे त्यांनी ठणकावले. दसरा मेळाव्यात पक्षप्रमुखांनी दिलेला विचार गावागावात, घराघरात पोहोचवा आणि निवडणुकीत गद्दारांना त्याची जागा दाखवा, असे आवाहन त्यांनी केले.

शाळांचा गणवेश गुजरातमधून घेणार

मिंधे सरकारने सध्या विचारांचा कचरा केला आहे. त्यांच्याकडे स्वतःचे काहीच नाही. आता म्हणे शाळांमधील मुलांना एकच गणवेश देणार, पण त्या गणवेशाचे कापड गुजरातमधून खरेदी केले जाणार आहे. हे परप्रांतीयांनाच का मोठे करत आहेत, असा सवाल करतानाच हे गुजरातप्रेम तुम्हाला पटतंय का, अशी विचारणाही पेडणेकर यांनी केली

 पाठीत खंजीर खुपसणाऱयांना मातीमध्ये गाडायचेच

अच्छे दिन आयेंगे’ अशी घोषणा करीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2014 ची निवडणूक जिंकली, तर  सरकारच्या बेजाबदारपणामुळे पुलवामा हल्ल्यात 40 जवान शहीद झाल्यानंतर बालाकोटचा सर्जिकल स्ट्राइक करीत 2019 च्या निवडणुकीत विजय मिळवला. त्यावेळी महाराष्ट्र आणि शिवसेना त्यांच्या सोबत होती म्हणून हा विजय मिळाला. मात्र निवडणुकीनंतर भाजपने शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला. पाठीत खंजीर खुपसणाऱया अशा गद्दारांना येणाऱया निवडणुकीत गाडायचेच, असा विश्वास शिवसेना नेते-आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केला.

मोदी यांनी 15 ऑगस्टच्या भाषणात मी पुन्हा एकदा पंतप्रधान होणार असल्याचे सांगितले. असा घमेंडी पंतप्रधान देशाला नको, असेही जाधव म्हणाले. संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार असलेल्या घटनात्मक सरकारी संघटनाही मोदी सरकारच्या काळात सरकारच्या मनमानीप्रमाणे राबवल्या जात आहेत. भाजप सरकारचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी या संघटनांचा दुरुपयोग होत आहे. त्यामुळे संविधान वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन निवडणुकीच्या माध्यमातून लढा दिला पाहिजे, असे आवाहनही जाधव यांनी यावेळी केले.

शिवसेना ड्रग्जमुक्त महाराष्ट्राचा लढा लढतेय

राज्याच्या सत्तेत बसलेले सत्ताधारी उडता पंजाबप्रमाणे उडता महाराष्ट्र करू पाहत आहेत. ड्रग्ज माफियांना पाठिशी घालत आहेत. गेल्या वीस दिवसांत राज्यात नाशिक, सोलापूर, मुंबई, संभाजीनरात शेकडो कोटी रुपयांचे ड्रग्ज सापडले आहे. त्याविरोधात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना लढा देतेय. महाराष्ट्राचा पंजाब होऊ नये, येथील तरुण-तरुणी नशेबाज होऊ नयेत म्हणून ठोस भूमिका घेतली जात असताना नाशिकचे पालकमंत्री, राज्याचे गृहमंत्री धमकावत आहेत, हे महाराष्ट्राचे दुर्दैव असल्याचे शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केले.

 नाशिकमध्ये एवढय़ा मोठय़ा प्रमाणात ड्रग्ज बनवला जात असताना त्याची सरकारला काहीच कशी माहिती नाही. जिह्याचे पालकमंत्री काय झोपा काढत होते का, असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला.

फडणवीस चाणक्य वाटत नाहीत

सध्या अनेकजण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चाणक्य म्हणत असले तरी ते चाणक्य वाटत नाहीत. चाणक्य माणसं घडवतात, शिवसेनाप्रमुखांनी, शरद पवारांनी अनेक माणसे घडवली, पण फडणवीसांनी कुणालाच घडवलं नाही, तर जमवलं. त्यांच्याच पक्षाचे विनोद तावडे, पंकजा मुंडे, खडसे यांच्यासारखी माणसं संपवली, आता चंद्रकांत पाटलांच्या मागे लागले असल्याचा टोला अंधारे यांनी लगावला.

भ्रष्टाचाऱ्यांना उलटे लटकवू म्हणणारे आता त्यांनाच मांडीवर घेऊन बसलेत संजय राऊत यांचा घणाघात

निवडणुकीच्या तोंडावर छत्तीसगडमध्ये गेलेले पेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भ्रष्टाचाऱयांना उलटे लटकवण्याची घोषणा केली आहे. मात्र महाराष्ट्रात भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱयांना भाजप मांडीवर घेऊन बसला आहे, असा घणाघात शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी आज केला. भ्रष्टाचाऱयांवर कारवाई करायचीच असेल तर त्याची सुरुवात महाराष्ट्रापासून करा आणि सर्वात आधी त्या 40 गद्दारांना उलटे लटकवा, असा सणसणीत टोलाही त्यांनी भाजपला लगावला.

पंतप्रधान मोदी यांनी राज्य सहकारी बँकेत 12 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचे जाहीर करून कारवाई करण्याचे संकेत देताच पुढच्या चार दिवसांत अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. त्यांच्यासह साखर कारखान्यात 200 कोटींचा आरोप असणारे हसन मुश्रीफ यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. दादा भुसे यांच्यावर शेतकऱयांचे 170 कोटी हडपल्याचे आरोप असताना तेदेखील सत्तेत सहभागी झाले. खरेतर एकनाथ शिंदे हाच एक महाघोटाळा असल्याचेही संजय राऊत म्हणाले. प्रताप सरनाईक यांच्याबाबतही कारवाई थंडावली. उदय सामंत यांनी 100 कोटींचा डांबर घोटाळा केलाय. शिवाय भाजपच्या राहुल कुल यांनी 500 कोटींचे मनी लॉण्डरिंग केल्याचे पुरावे ईडीला देऊनही कारवाई होत नाही. त्यामुळे ‘भाजप म्हणजे भ्रष्टाचार’ असे समीकरणच बनले असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, शिवतीर्थावर होणारा मेळावा हा एकमेव दसरा मेळावा असून दुसऱया मेळाव्याकडे जनता ढुंकूनही पाहत नाही. महाराष्ट्रात डुप्लिकेट चायनीज माल चालत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

अब की बार, ठाकरे सरकार!

भ्रष्टाचार करणारे भाजप सरकारमध्ये मंत्री होतात. त्यामुळे भाजपमध्ये भ्रष्टाचार हाच शिष्टाचार झाला आहे. महाराष्ट्र लुटण्याचे काम भाजप सरकार करीत आहे. मात्र महाराष्ट्राची जनता भ्रष्टाचाऱयांना 2024 मध्ये उलटे लटकवल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वाघनखांवरूनही भाजप राजकारण करीत आहे. मात्र आमची वाघनखे म्हणजे ही जनता आहे. ही जनता त्यांचा कोथळा काढल्याशिवाय राहणार नाही. ‘अब की बार, ठाकरे सरकार’, असा नारा देताना आमचे सरकार महाराष्ट्राला लागलेला कलंक धुऊन काढेल, असेही ते म्हणाले.

 उद्या आपले सरकार येणार आहे. नक्की आणणारआणणार म्हणजे आणणारच आणि आज जे दमदाटय़ा करताहेत त्यांनाही सांगून ठेवतोयतुम्ही आमच्या लोकांना जो त्रास देताय तो बंद झाला नाही तर आमचे सरकार आल्यानंतर तुम्हाला आम्ही उलटे टांगू.

 हे कमळा पसंदवाले

सध्या वर्ल्ड कप सुरू आहे. क्रिकेट सामना सुरू असताना मध्ये टीव्हीवर जाहिरातीही झळकतात. त्यातल्या एका जाहिरातीत अजय देवगण, अक्षय आणि शाहरुख हे तीन हिरो आहेत. हे तिघेही येतात आणि दोन दोन बोटं दाखवतात. तसे इकडेही तिघे जण आहेत. तेसुद्धा आमच्याकडे दोन दोन हाफ असल्याचे सांगतात. जाहिरातीतले हिरो ‘कमला पसंद’ वाले आहेत आणि हे तिघे ‘कमळा पसंद’ वाले आहेत. पसंद आपली आपली. त्यांना कमला पसंद आहे आणि यांना कमळा पसंद आहे. तुम्हाला जे घ्यायचे ते घ्या, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

भाजपा विघ्नसंतोषी

जातीपातीच्या भिंती उभ्या करून सगळ्यांना आपसांत लढवण्याचं काम जे भाजपा करतं आहे ते आपल्याला मोडून काढायचं आहे. ज्यांच्याशी आपण लढतो आहोत तो भाजपा कपटी आहे. भाजपा इतका विघ्नसंतोषी आहे की कुणाचंही लग्न असो हे जाणार, पंगतीत बसणार, भरपूर जेवणार, आडवा हात मारणार. श्रीखंड पुरी, बासुंदी, 35 पुरणपोळ्या खाणार, सगळ्या पुरणपोळ्या फस्त करुन ढेकर देणार. पण लग्नातून निघताना नवरा- बायकोत भांडण लावून निघणार असली ही भाजपा अवलाद आहे, असा घणाघाती हल्ला उद्धव ठाकरे यांनी केला.

गद्दारांच्या खोक्यांची लंका जाळणारच!

रावण शिवभक्त असूनही रामाने त्याला मारलं कारण रावण माजला होता. रावणाने सीतेला पळवलं होतं. सीताहरण केलं होतं. त्याचप्रमाणे आजसुद्धा आपली शिवसेना पळवण्याचा प्रयत्न होतो आहे पण एक लक्षात ठेवा. ज्याप्रमाणे हनुमानाने रावणाची सोन्याची लंका दहन केली होती तशीच तुमची खोक्यांची लंका दहन करणाऱया धगधगत्या मशाली आजसुद्धा माझ्यासोबत आहेत, असा इशाराच उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेशी गद्दारी करणाऱया खोकासुरांना दिला.

ज्यांना आगापिछा नाही तेसुद्धा हिटलरसारखे धोकादायक असतात

मला घराणेशाहीचा अभिमान आहे. जो कुटुंबव्यवस्था मानत नाही त्याने दुसऱयाच्या घराण्याबद्दल बोलू नये. आधी कुटुंबव्यवस्था माना मग घराणेशाहीवर बोला, कुटुंबव्यवस्था हा हिंदू संस्कृतीचा पाया आहे. तोच जर तुम्हाला मान्य नसेल तर तुम्ही आमच्यावर बोलणारे कोण? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता केला. ज्यांना आगापिछा नाही असे लोक धोकादायक असतात. हिटलर, मुसोलिनी, पुतीन, स्टॅलिन हे घराणेशाहीतून आले नाहीत, असे दाखले देत उद्धव ठाकरे यांनी तोफ डागली. मोदींना जितके बहुमत मिळाले त्यापेक्षा जास्त बहुमत हिटलरला मिळाले होते, असे नमूद करत ज्याचा आगापिछा नाही तो देशाची वाट लावून झोळी घेऊन निघून जाईल, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

मनोज जरांगेंचे विशेष आभार

मी मनोज जरांगे-पाटील यांचे विशेष आभार मानतो. त्यांनी योग्य भूमिका घेतली आहे. धनगरांनाही साद घातल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. जालन्यात जरांगे यांचं शांततेत आंदोलन सुरू होतं. मात्र या डायर सरकारने जालियनवालाप्रमाणेच या आंदोलनावर लाठीहल्ला केला. मी त्या सगळय़ा लोकांची भेट घेतली आणि वेदना जाणून घेतल्या, असे नमूद करताना जालन्यात पोलीस ज्याच्या आदेशाने रानटी बनले तो आदेश देणारा जनरल डायर कोण हे कळलेच पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

खुर्ची डळमळीत असेल तर देश मजबूत होतो

उद्धव ठाकरे यांनी आघाडीच्या राजकारणाची गरज अधोरेखित केली. एकाच पक्षाला पाशवी बहुमत असणारे सरकार आल्यानंतर काय होते हे देश आता पाहत आहे. त्यामुळे जेव्हा खुर्ची डळमळीत असते तेव्हा देश मजबूत होतो हे दिसून आले आहे. पी. व्ही. नरसिंह राव, अटलबिहारी वाजपेयी आणि डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळात आघाडय़ांचे सरकार होते. या काळात देश मजबूत झाला. त्यामुळे आता आपल्याला ‘मिलिजुली’, सगळ्यांना सोबत घेऊन जाणारे सरकार हवे आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

(फटकारे)

मुंबईच्या ठेवीवर डल्ला मारायचा आणि मुंबईला भिकेला लावून दिल्लीच्या दारात उभे करायचे हा डाव आहे, याविरोधात लढण्यासाठी मला तुमची साथ हवीय.

दुहीची बीजे पेरायची, भांडणे लावायची आणि खरे प्रश्न बाजूला सारायचे. तुमच्या चुली पेटवण्यापेक्षा आम्ही तुमची घरे पेटवतो आणि त्यावर आमची पोळी भाजतो हेच भाजपचे धोरण आहे आणि आता ते उघड झालेय.

कोरोनाकाळात तुम्ही मंदिरं उघडायला सांगत होता तेव्हा आम्ही गावागावात आरोग्य मंदिरं उघडत होतो.

कोरोना महामारीच्या वेळी तुमचे नेते दिल्लीतून रिकाम्या थाळ्या बडवत असताना आम्ही पाच रुपयांत गोरगरीबांना भरलेली थाळी देत होतो.

मर्द कधीही विकला जात नाही. मर्द कधीही विकत घेता येऊ शकत नाही. मर्दपणा रक्तात असावा लागतो. लाचारी असणारे कधी मर्द होऊ शकत नाहीत.