तीन वर्षांच्या विश्रांतीनंतर आलिशान डेक्कन ओडिसी पुन्हा धावणार

देशी-विदेशी पर्यटकांचे आकर्षण ठरलेली डेक्कन ओडिसी आलिशान ट्रेन तब्बल तीन वर्षांच्या विश्रांतीनंतर पुन्हा धावणार आहे. त्यानुसार गाडी नव्या रंगात आणि नव्या ढंगात धावण्यासाठी सज्ज झाली असून उद्या गुरुवारी दुपारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे उद्घाटन करण्यात येणार आहे. ही गाडी शुक्रवारपासून पर्यटकांच्या सेवेत दाखल होणार आहे. या गाडीची उद्घाटन फेरी सीएसएमटी ते ठाणे अशी होणार आहे. डेक्कन ओडिसी ही गाडी एमटीडीसी आणि रेल्वेने 2005 मध्ये सुरू केली होती, मात्र कोरोना महामारीमुळे मार्च 2020 पासून या गाडीची सेवा खंडित करण्यात आली होती. त्यामुळे सदरची आलिशान रेल्वे गाडी वाडीबंदर येथे धूळ खात उभी होती. गेल्या काही महिन्यांपासून या गाडीच्या आत आणि बाहेरील भागात अनेक नावीन्यपूर्ण बदल करण्यात आले असून ती पुन्हा पर्यटकांकरिता धावण्यासाठी सज्ज झाली आहे.