… आणि पंतला राग अनावर झाला

यंदाच्या आयपीएल मोसमात दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात निराशाजनक झाली असून पहिल्या दोन्ही सामन्यांत दिल्लीला पराभव पत्करावा लागला आहे. राजस्थानविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात झालेला पराभव दिल्ली पॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत याच्या चांगलाच जिव्हारी लागला. राजस्थानविरुद्ध पंत 26 चेंडूंत 28 धावा करून बाद झाला. बाद झाल्यानंतर पंतचा संयम सुटला आणि तो रागाच्या भरात भिंतीवर बॅट मारून तंबूत परतला.

कार अपघातानंतर झालेल्या दुखापतीतून सावरलेल्या ऋषभ पंतने यंदाच्या आयपीएल हंगामातून पुनरागमन केले. त्यामुळे पंतच्या खेळीकडे सर्वांचेच लक्ष होते, मात्र पहिल्या दोन्ही सामन्यांत पंतला मोठी खेळी साकारता आली नाही. पंजाबविरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यातून पंतने प्रदीर्घ काळानंतर क्रिकेटच्या मैदानावर पाऊल टाकले. या सामन्यात पंत मोठी खेळी करेल अशी अपेक्षा होती, मात्र पंत पंजाबविरुद्ध 13 चेंडूंत 18 धावा करून बाद झाला. राजस्थानविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात पंतची बॅट तळपेल अशी अपेक्षा असलेल्या क्रिकेटप्रेमींचा भ्रमनिरास झाला. या सामन्यातदेखील पंत मोठी खेळी करू शकला नाही. त्याने 28 धावांची झुंझार खेळी केली, मात्र तो संघाला पहिला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला.

राजस्थानविरुद्धच्या सामन्यात पंतला युझवेंद्र चहलने बाद केले. बाद झाल्यानंतर पंत चांगलाच संतापला होता. या संतापाच्या भरात त्याने तंबूत परतताना भिंतीवर बॅट आपटून आपल्या राग व्यक्त केला. पंतचा भिंतीवर बॅट आपटतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.