मराठी भाषा अन् महाराष्ट्रासाठी आझाद मैदानात धरणे आंदोलन

मराठी शाळांचे सक्षमीकरण आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासह अन्य मागण्यांसाठी येत्या 7 मार्च रोजी महाराष्ट्र संरक्षण संघटनेच्या वतीने आझाद मैदान येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला मराठीच्या व्यापक हितासाठी चळवळीने पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्र संरक्षण संघटनेच्या मुंबईसह महाराष्ट्र वाचवा कृती समितीतर्फे  हे आंदोलन होणार आहे. मराठी शाळांचे सक्षमीकरण करा, मराठी भाषेला अभिजात दर्जा, स्थलांतरितांचे लोंढे थांबवण्यासाठी व्हिसा कायदा करा, मराठी भाषा सार्वजनिक ठिकाणी सर्वांना अनिवार्य करा, नोकऱयांमध्ये मराठी भूमिपुत्रांना प्राधान्य देणारा कायदा करा, अधिवास कायदा 1960 पासूनचा करा, मुंबईतील मराठी भवन लवकरात लवकर बांधून पूर्ण करा. मराठी विद्यापीठ स्थापन करून बालवाडी ते पदव्युत्तर शिक्षण मराठी माध्यमातून द्या, मराठी व इंग्रजी असे द्विभाषा धोरण स्वीकारा अशा मागण्या महाराष्ट्र संरक्षण संघटनेने केल्या आहेत. दरम्यान, या मागण्यांना ‘मराठीच्या व्यापक हितासाठी चळवळी’तर्फे पाठिंबा असल्याचे प्रमुख संयोजक श्रीपाद जोशी यांनी सांगितले.