सृजन संवाद – असा हा एकच श्री हनुमान

>> डॉ. समिरा गुजर जोशी

चैत्र शुद्ध पौर्णिमेला आपण सारे मारुतीरायाचा जन्मोत्सव साजरा करणार.

मनोजवं मारुततुल्यवेगम् जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् । 

वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ।। 

?रामरक्षेमधील हा श्लोक म्हणताना मनाइतका चपळ असणारा, वाऱ्याच्या वेगाशी स्पर्धा करणारा, सर्व इंद्रियांवर विजय प्राप्त केलेला, बुद्धिमंतांमध्ये श्रेष्ठ असणारा, वायुपुत्र, वानरप्रमुख असणारा श्रीरामाचा हा दूत आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो. एखादे लहान मूल निरागसपणे विचारते की, मारुती तर वानर होता ना? मग तो इतका हुशार कसा होता? अशा वेळी तो देव होता ना ! असे उत्तर आपण देतो, पण त्याच्या जन्माची जी कथा वाल्मीकी रामायणात येते ती आपल्याला त्याच्या जन्माचा हेतूही सांगते आणि त्याचे गुणही सांगते.

तेव्हा आजच्या लेखात त्यानिमित्ताने वाल्मीकी रामायणात श्री हनुमानाच्या जन्माविषयी नेमके काय सांगितले आहे ते जाणून घेऊ या. कारण श्री हनुमानाच्या जन्माविषयी वेगवेगळ्या कथा ऐकिवात येतात. बहुधा आपण ऐकतो की, दशरथाला पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून यज्ञामध्ये जे पायस देण्यात आले, त्यातील एक भाग घारीने पळवला आणि पुत्रप्राप्तीच्या इच्छेने तप करणाऱ्या अंजनी नावाच्या वानरीच्या ओंजळीत योगायोगाने ते घारीच्या चोचीतील पायस पडले व तिच्या पोटी हनुमंताचा जन्म झाला. इतरही काही कथा प्रसिद्ध आहेत. पण वाल्मीकी रामायण केवळ हनुमंताच्या जन्माविषयी सांगते असे नाही, तर संपूर्ण वानर सैन्याविषयी बालकांडाच्या सतराव्या सर्गात सविस्तर माहिती देते. या सर्गात सांगितल्याप्रमाणे, दशरथ राजाच्या पोटी भगवान विष्णू जन्माला येणार हे निश्चित झाल्यावर ब्रह्मदेव सर्व देवांना म्हणाले की, भगवान विष्णू हे वीर, सत्यवचनी आणि सर्वांचे कल्याण इच्छिणारे आहेत. त्यांच्या या मानव अवतारात त्यांना सहाय्यभूत ठरतील असे वीर सहाय्यक त्यांच्यासाठी पृथ्वीवर निर्माण करावेत. येथे ते ‘कामरूपी’ असावेत, म्हणजे मनात येईल ते रूप धारण करण्याची क्षमता असणारे असावेत असे सांगितले आहे. मग वानर सैन्यातील जे प्रमुख वानर आहेत ते कोणकोणत्या देवतेपासून जन्माला आले याची एक यादीच दिली आहे. जसे की, वाली हा इंद्रपुत्र आहे तर सुग्रीव सूर्यपुत्र, नल हा विश्वकर्मा याचा पुत्र आहे, तर नील हा अग्निपुत्र आहे इत्यादी. यानंतर मग हनुमानाचा उल्लेख येतो तो असा –

मारुतस्यौरस श्रीमान् हनुमान्नाम वानर।

वज्रसंहननोपेतो वैनतेयसमो जवे ।।

सर्ववानरमुख्येषु बुद्धिमान् बलवानपि । 

ते सृष्टा बहुसाहस्रा दशग्रीववधोद्यताः ।।  (16 – 17)

जे हजारो वानर दशग्रीव (म्हणजेच दहा तोंडे असणाऱ्या) रावणाच्या विनाशासाठी निर्माण करण्यात आले, त्या सर्व वानरांच्या प्रमुखांमध्येही बुद्धिवान, बलवान असा, वज्राप्रमाणे बळकट देह असणारा आणि वेगामध्ये गरुडाशी तुलना करावी असा हनुमान नावाचा वानर वायूचा औरस पुत्र होय. यावरून लक्षात येते की, हे वानर सैन्य एका खास हेतूने निर्माण झालेले आहे आणि त्यांची तुलना सर्वसामान्यपणे वानरांशी करणे किंवा त्यांची गणना पशुवर्गात करणे हे उचित वाटत नाही. हनुमान कधी महाविराट रूप धारण करतो तर कधी सूक्ष्म रूप! त्याची राम – लक्ष्मण यांच्याशी पहिली भेट होते तेव्हा तर तो त्यांना बटू रूपात भेटतो. याचे कारण तो जन्मतच कामरूपी आहे. पुढे किष्किंधा कांडामध्ये 66 व्या सर्गात जांबुवंत हनुमंताला त्याच्या जन्मकथेची आठवण देऊन तो एकटाच समुद्र ओलांडून  जाण्यास पात्र आहे हे सांगतो. तेव्हा तो सांगतो की, त्याची माता अंजनी ही मुळात एक अप्सरा असून केवळ शापाच्या प्रभावामुळे ती वानरी रूपात जन्माला आली. त्याचा पिता केसरी हाही शक्तिशाली वानरप्रमुख आहे. महापरामी आहे. एकदा अंजनीला तिच्या मूळ रूपात म्हणजे अप्सरा वेषात फिरताना पाहून वायू तिच्याकडे आकृष्ट झाला (तीही कामरूपिणी आहे), पण ती विवाहिता आहे हे कळल्यावर त्याने तिला वर दिला की, तुझ्या पोटी माझ्यासारखे गुण असणारा पुत्र जन्माला येईल. तो वीर असेल, बुद्धिमान असेल आणि माझ्या सारखा सर्वत्र संचार करणारा, उड्डाण करू शकणारा असेल. अशा प्रकारे तो मरुताचा पुत्र म्हणून ‘मारुती‘ झाला, पण त्याच वेळी त्याची माता अंजनी म्हणून तो ‘अंजनीपुत्र’ आणि जन्मदाता पिता केसरी म्हणून तो ‘केसरीनंदन’ आहे. मरुताच्या या वराचा प्रत्यय मारुतीच्या लहानपणीच आला. यासंदर्भात येथेच तो बालक असताना उड्डाण करू शकत असल्यामुळे सूर्यबिंबाकडे कसा झेपावला ही कथा वाल्मीकी रामायणात येते. त्या वेळी इंद्राने सूर्याचे रक्षण करण्यासाठी वज्र फेकले, त्याने मारुतीच्या डाव्या हनुवटीला जखम झाली आणि त्याला ‘हनुमान’ हे नाव प्राप्त झाले. त्या वेळी मुलाला इजा झाली म्हणून वायू रागावला आणि त्याने वाहणेच बंद केले. तेव्हा त्याचा राग शांत करून ब्रह्मदेवाने हनुमंताला आशीर्वाद दिला की, युद्धात कोणत्याही शस्त्राने तुझा वध होणार नाही आणि तू अजिंक्य योद्धा होशील, तर इंद्राने त्याला वर दिला की, तुझा मृत्यू तुझ्या अधीन असेल. मारुती चिरंजीव आहे याविषयी पण अनेक कथा आहेत, पण वाल्मीकी रामायणात त्याचे हे कारण सांगितलेले आढळते.

मारुतीच्या ठायी बुद्धी आणि शक्ती या दोन्हींचा संगम आहे. या कथांमधील अद्भुताचा भाग जरी बाजूला ठेवला तरी बुद्धी आणि शक्ती हे दोन्ही असूनही हनुमंत अतिशय नम्र होता. या विनम्र आचरणानेच तो प्रभू रामांचा सखा आणि भक्त झाला. श्री हनुमान आपल्यालाही याच प्रकारे वागण्याची प्रेरणा देतो हे निश्चित.

[email protected]

 (निवेदिका, अभिनेत्री आणि संस्कृत – मराठी वाङ्मयाची अभ्यासक)