बाजार लालेलाल, सेन्सेक्स गडगडला; गुंतवणुकदारांनी 5 लाख कोटी गमावले

जागतिक पातळीवर सुरू असलेल्या आर्थिक घडामोडींचे परिणाम शेअर बाजारावर पाहायला मिळाले. या घडामोडींमुळे सेन्सेक्स 900 हून जास्त अंकानी कोसळला होता. अमेरिकेच्या आर्थिक परिस्थिती संदर्भातील आकडे हे चिंता वाढवणारे असून त्याचे पडसाद जगभरातील शेअर बाजारांवर पाहायला मिळाले. जवळपास 12 वर्षांनी अमेरिकेचे रेटींग कमी करण्यात आले आहे. फिच रेटींग्जने अमेरिकेचे रेटींग घटवले असून 2011 सालानंतर अमेरिकेवर ही पहिल्यांदाच नामुष्की आली आहे. या घडामोडींचे परिणाम हिंदुस्थानी शेअर बाजारावर देखील पाहायला मिळाले. दुपारी 2 वाजून 46 मिनिटांनी सेन्सेक्समध्ये 910 अंकांची घसरण पाहायला मिळाली.

अमेरिकेच्या आर्थिक परिस्थितीवर वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाऊ लागलं आहे. यापूर्वी स्टँडर्ड अँड पुअर्स या मानांकन संस्थेनेदेखील अमेरिकेचे मानांकन घटवले होते. अमेरिकेवर स्थानिक, राज्य आणि देशपातळीवरील कर्जाचा बोजा प्रचंड वाढला आहे. ही बाब लक्षात घेऊन फिच मानांकन संस्थेने अमेरिकेचे मानंकन AAA वरून AA केले आहे. अमेरिका सध्या ज्या पातळीवर आहे ते पाहता अमेरिकेला दिलेले हे सगळ्यात जास्त मानांकन असल्याचे फिच या संस्थेने सांगितले आहे. वाढता खर्च आणि करांमुळे अमेरिकेवरील कर्जाचा बोजा वाढला आहे. अमिरेकेचे मानांकन घसरणार असल्याचा इशारा फिचने मे महिन्यातच दिला होता. मात्र त्यावेळी या संस्थेने मानांकन घटवले नव्हते.

शेअर बाजारातील या पडझडीमुळे गुंतवणूकदारांनी 5 लाख कोटी रुपये गमावले. शेअर बाजारातील पडझडीमुळे सगळ्याच क्षेत्रातील शेअरच्या किंमती लाल रंगात पाहायला मिळत होत्या. बँकींग क्षेत्र आणि धातू या क्षेत्रातले शेअर्स हे सगळ्यात जास्त पडले आहेत. टाटा स्टील, टाटा मोटर्स, हिरो मोटो, आयशर मोटर्स आणि कोल इंडियाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. रिलायन्स आणि एचडीएफसी बँकेचे शेअर्सही 1.5 टक्क्यांनी घसरले होते. सेन्सेक्समधील 30 पैकी 27 शेअर्स हे बुधवारी कोसळले होते.