रावेर लोकसभा निवडणूक पक्षाने आदेश दिल्यास सुनेविरुद्ध लढणार

पक्षाने आदेश दिल्यास रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे संकेत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी दिले. जर त्यांना राष्ट्रवादीने संधी दिली तर या मतदारसंघात सासरे विरुद्ध सून असा सामना रंगणार आहे.2024मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. भाजपला रामराम करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले एकनाथ खडसे यांनी पत्रकारांशी बोलताना पक्षाने संधी दिल्यास रावेर मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली. 1990पासून काँग्रेस रावेर लोकसभा मतदारसंघ लढत आहे. मात्र त्यांना एकदाही यश मिळाले नाही. त्यामुळे इंडिया आघाडीच्या माध्यमातून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली तर नक्कीच चित्र बदलेल, असा विश्वास एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला.