Lok Sabha Election 2024 : युतीधर्म आपणच पाळायचा का? ‘वर्षा’वरील बैठकीत मिंधेंच्या आमदारांचा थयथयाट

लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून शिंदे गटामध्ये निर्माण झालेल्या संतापाचा आज अखेर विस्फोट झाला. पाच जागांवरून आक्रमक झालेल्या शिंदे गटाच्या आमदारांनी अक्षरशः थयथयाट करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच धारेवर धरले. आपल्यामुळे भाजप व राष्ट्रवादीला सत्तेची फळे मिळाली, मग जागावाटपात युतीधर्म आम्हीच पाळायचा का? आम्ही अपमान का सहन करायचा, असा थेट सवाल आमदारांनी मुख्यमंत्र्यांना केला.

लोकसभा निवडणुकीतील महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा कायम आहे. जागा वाटपात हिंगोली, वाशिम यवतमाळमध्ये शिंदे गटाच्या आमदारांचे तिकीट कापले आहे. नाशिकच्या जागेवरही राष्ट्रवादी काँग्रेसने दावा ठोकला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या शिंदे गटाच्या आमदारांची खदखद वर्षा बंगल्यावरील बैठकीत बाहेर पडली.

मुख्यमंत्र्यांनी चुचकारले

संतापलेल्या या आमदारांची समजूत काढताना एकनाथ शिंदे यांना अक्षरशः कसरत करावी लागली. युतीमध्ये जेव्हा तीन पक्ष एकत्र येतात तेव्हा काही वाटा द्यावा लागतो. तक्रार करण्यापेक्षा युती धर्म पाळावा ज्यांना उमेदवारी दिली नाही त्यांचे योग्य प्रकारे पुनर्वसन केले जाईल असे आश्वासन देण्याची वेळ एकनाथ शिंदे यांच्यावर आली.

गोडसेंच्या कार्यकर्त्यांची मुख्यमंत्र्यांसमोर घोषणाबाजी

माजी मंत्री बबन घोलप यांनी मिंधे गटात प्रवेश केला त्यावेळी हेमंत गोडसे यांच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोरच घोषणाबाजी केली. नाशिकच्या जागेवर शिंदे गटाचे हेंमत गोडसे इच्छुक आहेत. पण हेमंत गोडसे यांचा पत्ता कट करून या जागेवर अजित पवार गटाचे छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याने गोडसे व त्यांचे समर्थक अस्वस्थ असून, त्याचे पडसाद वर्षा बंगल्यावर उमटले.

महायुतीतील तिढय़ाची कबुली दिली

महायुतीत चार जागांवर तिढा असल्याची कबुली आमदार संजय शिरसाट यांनी दिली. नाशिक, संभाजीनगर, ठाणे आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग या जागांवर आम्ही आग्रही आहोत. पण एक-दोन दिवसात या जागेचा तिढा सुटेल, असा दावाही त्यांनी केला.

– शिंदे गटाने मागितलेल्या लोकसभेच्या जागांवर भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (अजित पवार गट) दावा केल्यामुळे शिंदे गटाच्या आमदारांमध्ये संतापाची भावना आहे. या संतापाचा या बैठकीत विस्पह्ट झाला.

– आम्ही तुमच्यासोबत आलो म्हणून मित्रपक्षाला सत्तेची फळे मिळाली. परभणी, धाराशीव हे हक्काचे मतदारसंघ सोडून आपण युतीधर्म पाळला. पण आपले मित्रपक्ष युतीधर्म पाळत आहेत का, असा थेट सवाल आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट केला.

– रायगड, शिरुर हे आपल्या हक्काचे मतदारसंघ मित्रपक्षाला देऊन आपण अपमान सहन केला आणि अपमान सहन करून प्रचारही सुरू केला. पण आता नाशिक, संभाजीनगर, ठाणे आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ आपण अजिबात सोडू नये. पालघरही देऊ नका, अशी ठाम भूमिका आमदारांनी मांडली.