निवडणूक प्रशिक्षणादरम्यान महागावच्या मद्यपी अभियंत्याचा धुडगूस, उमरखेड पोलीस ठाण्यात तक्रार

प्रसाद नायगावकर, यवतमाळ

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड उपविभागीय अधिकारी यांच्या उपस्थितीत प्रशिक्षण सुरू होते. या प्रशिक्षणादरम्यान एका अभियंत्याने चक्क दारू पिऊन गोंधळ माजविल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

मागील पंधरा दिवसापासून निवडणूक विभाग हा लोकसभेच्या तयारीला लागला आहे . यापूर्वी निवडणूक विभागाने वेळोवेळी प्रशिक्षण घेतले आहे. आज रोजी दुपारी तीन वाजता दरम्यान येथील शासकीय धान्य क्रमांक दोनच्या गोडाऊनमध्ये इव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनच्या नोंदी कशा प्रकारच्या ठेवाव्यात याचे कार्य प्रशिक्षण सुरू होते. हा कार्यक्रम चालू असताना महागाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता माधव गोविंद उघडे यांनी दारूच्या नशेत एकच गोंधळ सुरू केला.

अतिशय महत्त्वाच्या या कार्यात व्यत्यय आणून त्यांनी निवडणूक संबंधाने नेमून दिलेल्या टेबल क्रमांक 27 वरील काम करण्याचे निर्देश पार पाडले नाही. दारूच्या नशेत त्यांनी काम करण्यास चक्क नकार दिला व ईव्हीएम मशीन व व्हीव्हिपॅट मशीन चुकीच्या पद्धतीने सील केले. तेव्हा त्याच्या टेबलवरील शेजारी इतर कर्मचाऱ्यांनी ही बाब उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे यांच्या लक्षात आणून दिली. केलेली चूक गंभीर असून दुरुस्ती करण्याच्या सूचना यावेळी सदर अभियंता यांना देण्यात आल्या. मात्र तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता व चूक दुरुस्ती करीत नाही म्हणून गोंधळ घालून हातातील कागदपत्रे भिरकावून दिली. यावरून नायब तहसीलदार वैभव पवार यांनी उमरखेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून तक्रारीवरून सदर अभियंता माधव उघडे यांचे मेडिकल केले असून 134 लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 व दारूबंदी कायद्याप्रमाणे कारवाई व्हावी अशी तक्रार करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.