फलटणमधील विद्युत ट्रान्स्फॉर्मर चोरीच्या 18 गुह्यांची उकल

परिसरातील डीपी (ट्रान्स्फॉर्मर) चोरीचे 18 गुन्हे फलटण ग्रामीण पोलिसांनी उघडकीस आणून 8 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी फलटण शहरातील तिघांना अटक केली आहे.

फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील डीपी चोरीच्या घटना वाढल्यामुळे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी तपासाच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस व पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण ग्रामीण पोलिसांचे विशेष पथक तयार करण्यात आले होते.

या पथकाने तपास करून संतोष जगन्नाथ घाडगे, सागर युवराज घाडगे, किरण भीमराव घाडगे (सर्व रा. मलटण, ता. फलटण, जि. सातारा) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी इतर साथीदारांसह फलटण तालुक्यात तसेच वाठार, लोणंद, फलटण शहरात डीपीचोरी केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्या ताब्यातून 380 किलो वजनाचे तांबे व चोरी करण्यास वापरलेली ओमनी असा एकूण आठ लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलीस उपनिरीक्षक लागर अरगडे, सहायक उपनिरीक्षक मोहन हांगे, पोलीस हवालदार अरुण शेंडे, महादेव पिसे, नितीन चतुरे, अमोल जगदाळे, तुषार आडके, विक्रम कुंभार, तुषार नलवडे, हनुमंत दडस, श्रीकांत खरात यांनी ही कारवाई केली.