बायकोकडून होणाऱ्या छळामुळे क्रिकेटपटू शिखर धवनला घटस्फोट मंजूर

क्रिकेटपटू शिखर धवन आणि त्याची पत्नी आएशा मुखर्जी यांच्या घटस्फोटाला दिल्लीतील कौटुंबिक न्यायालयाने मंजुरी दिली आहे. पत्नीकडून होत असलेल्या मानसिक छळामुळे न्यायालयाने हा घटस्फोट मंजूर केल्याचे कळते आहे. न्यायमूर्ती हरीश कुमार यांच्यासमोर घटस्फोटाच्या याचिकेवर सुनावणी झाली. न्यायमूर्तींनी शिखर धवन याने पत्नीवर केलेले सगळे आरोप ग्राह्य धरण्यात आले आहे. आएशा या आरोपांचा विरोध करू शकली नाही किंवा स्वत:चा त्यापासून बचाव करू शकली नाही ज्यामुळे हे आरोप न्यायालयाने ग्राह्य धरले. आपल्या मुलापासून आएशाने आपल्याला अनेक वर्ष दूर ठेवलं. यामुळे आपल्याला मराच मानसिक त्रास झाल्याचे शिखरने म्हटले आहे.

धवन याने त्याच्या याचिकेत म्हटले होते की, आएशाने सुरूवातीला हिंदुस्थानातच राहण्याचे कबूल केले होते. मात्र तिच्या आधीच्या पतीपासून झालेल्या दोन मुलींमुळे तिने ऑस्ट्रेलियाला जाण्याचा निर्णय घेतला. आधीच्या पतीने सांगितल्यामुळे तिने तिथेच कायमस्वरुपी राहण्याचा निर्णय घेतला. यामुळे शिखर धवन याला त्याच्या मुलाला भेटता येत नाहीये. आएशा हे आरोप पूर्णपणे फेटाळू शकली नाही. आपली हिंदुस्थानात राहायची इच्छा आहे, मात्र आपल्या काही जबाबदाऱ्यांमुळे आपल्याला ऑस्ट्रेलियात राहावे लागत असल्याचे तिने न्यायालयाला सांगितले.

कोर्टाने आएशा धवनला मुलाला असलेल्या शाळेच्या सुट्टीचा अर्धा कालावधी धवन आणि त्याच्या कुटुंबासोबत घालवावा आणि त्याला या कुटुंबासोबत रात्रीही राहण्याची मुभा असल्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. 37 वर्षांच्या धवनची विश्वचषक स्पर्धेसाठी हिंदुस्थानी क्रिकेट संघात निवड झालेली नाहीये. संघात परत स्थान मिळावे यासाठी धवनचा संघर्ष सुरू आहे. शिखर धवन आणि आएशा यांची प्रेमकहाणी फिल्मी प्रकारची होती. हरभजन सिंगच्या फ्रेंडलिस्टमध्ये शिखर धवनने आएशाला पाहिलं होतं. पाहताच क्षणी त्याला ती आवडली होती. त्याने फेसबुकवर आएशाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. यानंतर दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते. शिखर धवन हा आएशापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. या दोघांचा 2009 साली साखरपुडा झाला होता आणि 2012मध्ये या दोघांचे लग्न झाले होते. शिखरचे हे पहिले लग्न होते तर आएशाचे हे दुसरे लग्न होते. आएशाला आधीच्या लग्नापासून रेया आणि आलिया या दोन मुली आहेत. रेयाचे वय 21 वर्षे आहे तर आलियाचे वय 17 वर्षे आहे. आएशा आणि शिखर धवन यांना जोरावर नावाचा मुलगा आहे.