हर्णे समुद्रात उसळणाऱ्या महाकाय लाटांमुळे मच्छिमारीला ब्रेक, मासेमारांच्या नौका अजूनही किनाऱ्यावरच

शासनाकडून मासेमारीला अधिकृत परवानगी मिळालेली असली, तरी हर्णे येथील समुद्रात उसळणाऱ्या महाकाय लाटांच्या तांडवामुळे मासेमारी करण्यासाठी मासेमारांनी आपल्या नौकांना अजूनही समुद्रात लोटलेले नाही. दापोली तालुक्यातील हर्णे बंदर हे जिल्ह्यातील मासेमारीसाठी दुसऱ्या क्रमांकाचे बंदर ओळखले जाते. या बंदरात मासेमारी करणाऱ्या 850 बोटी या नोंदणीकृत परवानाधारक बोटी आहेत. हर्णे हे बंदर मासेमारीसाठी सुप्रसिध्द बंदर असले तरी हर्णे गावाच्या लगतचे पाजपंढरी हे गाव मच्छिमार दर्यावर्दी कोळी समाज वस्तीचे गाव आहे. येथील लोकांच्या उदरनिर्वाहनाचा व्यवसाय मासेमारी हाच आहे.

त्यामुळे 1 जून ते 31 जुलै या 61 दिवसांत शासनाने मासेमारीस बंदी केली होती. बंदिचा हा काळ संपून चार दिवस उलटून गेले तरीही समुद्रात अजून कोणीही मासेमारी करण्यासाठी जाण्यासारखी परिस्थिती नाही. समुद्र अजूनही खवळलेला आहे. वेगाने वाहणारा वारा आणि समुद्रात उसळणाऱ्या महाकाय लाटांमुळे मासेमारीसाठी समुद्रात जाणे धोक्याचे झाले आहे. त्यामुळे गेल्या 4 दिवसांपासून समुद्रात मासेमारीसाठी जाण्याच्या तयारीच्या प्रतिक्षेत असलेल्या मासेमारांनी आपल्या नौका अजूनही मासेमारीसाठी समुद्रात लोटलेल्या नाहीत. त्यामुळे मासेमारीचा शुभारंभाचा दिवस पुढे पुढे जात आहे.

समुद्र शांत व्हायला अजून किती दिवस लागतील, या प्रतिक्षेत मासेमार आहेत. पूर्वी साधारणपणे नारळी पौर्णिमेला दर्याराजाला शांत होण्यासाठी कोळी बांधव नारळ अर्पण करीत आणि त्यानंतर मासेमारीला शुभारंभ करीत असत, मात्र कालौघात आता परिस्थिती बदलली आहे. आता नारळी पौर्णिमेची वाट न पाहताच शासनाने 1 ऑगस्टपासून मासेमारीस परवानगी दिल्याने मासेमारही शासनाच्या निर्धारित निर्णयाप्रमाणे मासेमारी व्यवसाय दरवर्षाला सुरू करत असले, तरी निसर्ग मात्र आपल्या कालचक्रानुसारच परिक्रमा करत असतो. त्यामुळे नारळी पौर्णिमेपर्यंत समुद्र शांत होण्याची वाट पाहावी लागणार का ? अशी चिंता मासेमारांना सतावत आहे.