फ्लेमिंगोंची गुलाबी नक्षी

 

गेल्या काही वर्षांत आपल्याकडे स्थलांतरित फ्लेमिंगो मोठय़ा प्रमाणात पाहावयास मिळत आहेत. मुंबई, नवी मुंबई आणि  ठाण्यातील खाडीकिनारी, पाणथळ जागी फ्लेमिंगोंच्या झुंडी दिसतात. नेरुळच्या डीपीएस तलावात सध्या फ्लेमिंगोंची गुलाबी नक्षी उमटली आहे.

हे पक्षी दरवर्षी नवी मुंबई आणि ठाणे परिसरात हजारोंच्या संख्येने दाखल होतात. अभ्यासानुसार, हे फ्लेमिंगो गुजरातमधील कच्छचे रण आणि राजस्थानमधील सांभर तलाव येथून येतात. काही पक्षी हे पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण आणि इस्रायलमधून स्थलांतर करून हिंदुस्थानात पोहोचतात.

जगात सहा जातींचे फ्लेमिंगो असले तरी नवी मुंबईच्या खाडीमध्ये लेसर आणि ग्रेटर असे दोन जातींचे फ्लेमिंगो पाहायला मिळत आहेत. ज्या ठिकाणी शुद्ध पाणी असते, तिथेच फ्लेमिंगो आढळून येतात.  फ्लेमिंगोचे आगमन होत असल्याने ठाणे आणि वाशीच्या खाडीपट्टय़ात 1,690 हेक्टरचे फ्लेमिंगो अभयारण्य तयार करण्यात आले आहे. इथे असलेले विशिष्ट प्रकारचे शेवाळ, कोळंबी हे त्यांचे मुख्य खाद्य आहे. नवी मुंबईच्या खाडीकिनारी शेवाळ, लहान मासे,  झिंगा आदी मुबलक खाद्य मिळत असल्याने फ्लेमिंगोंची पसंती या भागात जास्त आहे.

 

परदेशी पाहुण्यांचे स्वागत

दरवर्षी युरोपीय देशांमधून 150 प्रकारचे पक्षी हिवाळ्यात मुंबई, ठाण्यातील पाणथळ जागी येतात. अडीच लाखांपेक्षा अधिकच्या संख्येने हे पक्षी येतात. यामध्ये 99 टक्के फ्लेमिंगो असतात. मुंबईत शिवडी, भांडुप पंपिंग स्टेशन येथे
फ्लेमिंगो दर्शन होते.  फ्लेमिंगो पक्ष्यांचे दर्शन हा मुंबईकरांसाठी पर्यटनाचा भाग झाला आहे.  सीवूडच्या खाडीकिनारीही हजारोंच्या संख्येने परदेशी पाहुणे पहावयास मिळत आहेत.