हिंदुस्थानातील मुस्लिम आधी हिंदूच होते! गुलाम नबी आझाद यांचे विधान

हिंदू धर्म हा इस्लामपेक्षा खूप जुना असून हिंदुस्थानातील मुस्लिम हे आधी हिंदूच होते. 600 वर्षांपूर्वी जम्मू-कश्मीरमध्ये सर्वच कश्मिरी पंडित होते, कुणीही मुस्लिम नव्हते, असे विधान जम्मू-कश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी केले. केवळ 10 ते 20 मुस्लिम मुघल सैन्याचा भाग बनून हिंदुस्थानात आले होते. त्यांनी इतरांचे धर्मपरिवर्तन केल्याचेही ते म्हणाले.

गुलाम नबी आझाद यांनी केलेले भाषण सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले असून या व्हिडीओत ते हिंदू धर्माबाबतचे विधान करताना दिसत आहेत. पुढे ते म्हणाले, मी संसदेत अनेक गोष्टी मांडल्या, ज्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या नाहीत. आपल्या एका नेत्याने म्हटले, काही लोक बाहेरून आले होते. यावर मी म्हटले, कुणीही आतून किंवा बाहेरून आले नव्हते. इस्लाम हा धर्मच मुळी दीड हजार वर्षांपूर्वी आला. हिंदू धर्म खूप जुना आहे, असे आझाद म्हणाले. मुघल सैन्यात केवळ 10 ते 20 मुस्लिम होते. त्यांनी हिंदुस्थानात अनेकांचे मुस्लिम धर्मात परिवर्तन केल्याचा दावाही आझाद यांनी केला.

आझाद किती मागे गेले होते माहीत नाही ः मेहबुबा मुफ्ती

गुलाम नबी आझाद यांच्या विधानाची जम्मू-कश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी खिल्ली उडवली आहे. त्या म्हणाल्या, मला माहिती नाही की आझाद किती मागे गेले होते. तसेच आपल्या पूर्वजांबाबत त्यांना किती माहिती आहे हेदेखील मला माहिती नाही. पण मी त्यांना एक सल्ला जरूर देईन की, मागेच जायचे झाले तर त्यांनी मागेच जावे, कदाचित त्यांना एखादा माकड वगैरे त्यांच्या पूर्वजांमध्ये मिळून जाईल.