वर्दळीच्या ठिकाणी बलात्कार होऊ शकत नाही! हायकोर्टाचे महत्त्वपूर्ण मत

वर्दळीच्या ठिकाणी बलात्काराची घटना घडू शकत नाही, असे महत्त्वपूर्ण मत उच्च न्यायालयाने नोंदवले आणि जुहू चौपाटीवरील बलात्काराच्या घटनेतील आरोपीची जामिनावर सुटका केली. भरदिवसा वर्दळीच्या जुहू चौपाटीवर आरोपी पीडितेवर बळजबरीने शारीरिक संबंध ठेवेल हे कोणाच्याही मनाला पटत नाही. कोणताही विचारी माणूस यावर विश्वास ठेवणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.

न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या एकलपीठाने हा निर्णय दिला. सरकारी पक्षाच्या म्हणण्यानुसार, आरोपी हा इमारतीत वॉचमन असताना तेथे घरकाम करणाऱया पीडित मुलीशी त्याची ओळख झाली. त्यांच्या मैत्रीचे प्रेमसंबंधात रूपांतर झाले. 14 मे 2021 रोजी आरोपीने शरीरसंबंध ठेवण्याबाबत पीडितेकडे इच्छा व्यक्त केली. मात्र पीडितेने नकार देताच आरोपीने तिला बळजबरीने जुहू चौपाटीवर नेले आणि तेथे तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी आरोपी वॉचमनविरुद्व ‘पोक्सो’ कायदा आणि भादंवि कलमांतर्गत गुन्हा नोंदवून त्याला अटक केली होती. कथित घटना घडली तेव्हा पीडित मुलगी प्रौढ होती. त्यामुळे ‘पोक्सो’ कायद्यातील तरतुदी लागू करण्याचा प्रश्न येत नाही, असा दावा करीत आरोपीने जामिनासाठी दाद मागितली होती. न्यायालयाने त्याचा हा दावा प्रथमदर्शनी मान्य करीत जामीन मंजूर केला.