महामार्ग पोलीस अॅक्शन मोडवर, समृद्धी महामार्गावर प्रत्येक वाहनाची झाडाझडती

अपघात होऊ नये याकरिता ठोस उपाययोजना न करता मिंधे सरकारने घाईघाईत समृद्धी महामार्गाचे उद्घाटन केले. परिणामी त्या महामार्गावर वारंवार अपघाताच्या घटना घडून त्यात प्रवाशांचे नाहक जीव जात आहेत. त्यामुळे महामार्ग पोलिसांनी आता गंभीर दखल घेतली असून समृद्धी महामार्गावर प्रत्येक वाहनाची झाडाझडती घेण्यास सुरुवात केली आहे. दोन दिवसांत पोलिसांनी 98 ट्रॅव्हल्स बसेसची तपासणी केली आहे.

1 जुलै रोजी बुलढाणा येथील पिंपळखुटी येथे नागपूर ते पुणे प्रवास करणाऱया विदर्भ ट्रॅव्हल्सचा अपघात होऊन बसला लागलेल्या आगीत 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. हा भीषण अपघाता आधीदेखील अनेक अपघात समृद्धी महामार्गावर होऊन त्यात अनेकांचा जीव गेलेला आहे. त्यामुळे आता महामार्ग पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली आहे. महामार्ग पोलीस विभागाचे प्रमुख अपर पोलीस महासंचालक रवींद्र कुमार सिंगल यांच्या निर्देशानुसार नागपूर परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली समृद्धी महामार्गावर प्रत्येक वाहनातील टायरची स्थिती, नायट्रोजन हवा, आपत्कालीन खिडकी, अग्निशमन यंत्र, प्रथमोपचार, दोन चालक/वाहक, चालकाचे वैध प्रमाणपत्र, आसनाची क्षमता आदी बाबींची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे.

सुरक्षित प्रवासासाठी जनजागृती
वाहनांच्या तपासणीबरोबरच समृद्धी महामार्गावरील टोलप्लाझा तसेच पेट्रोलपंपाच्या ठिकाणी महामार्गावरून प्रवास करणाऱया नागरिकांना सुरक्षित प्रवासाच्या अनुषंगाने जनजागृतीसुद्धा करण्यात येत आहे. इतकेच नाही तर बेजबाबदार चालकांवर कायदेशीर कारवाईदेखील करण्यात येत असल्याचे सांगण्यात येते.