एनसीपी म्हणजे नॅचरल करप्ट पार्टी म्हणता…मग भाजप महाराष्ट्रात राष्ट्रवादीसोबत सत्तेत कशी?

माझ्या बारामती मतदारसंघात येऊन भाजपच्या दिग्गज नेत्यांनी काय म्हटले होते? एनसीपी म्हणजे नॅचरल करप्ट पार्टी आहे. राष्ट्रवादी भ्रष्टाचारी असेल तर मग महाराष्ट्रात राष्ट्रवादी कॉँग्रेस भाजपसोबत कशी काय, असा संतप्त सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत केला. आम्ही तुमच्याबरोबर आलो तर चांगले आणि विरोधात गेलो तर वाईट असे नसते. ही लोकशाही आहे, अशा शब्दांत त्यांनी भाजपला ठणकावले.

दिल्ली अध्यादेशावरील चर्चेत भाग घेताना सुप्रिया सुळे यांनी भाजपच्या सोयीच्या राजकारणाची चांगलीच चिरफाड केली. भाजपकडून कायमच आमच्यावर घराणेशाहीचा आरोप केला जातो, पण मला भाजपला एक प्रश्न विचारायचा आहे, घराणेशाहीचा मुद्दा तुम्ही उपस्थित करता, मग एनडीएची बैठक जेव्हा होते तेव्हा जी.के. वासन, चिराग पासवान, प्रफुल पटेल, दुष्यंत चौटाला हे सगळे असतात. हे सगळे घराणेशाहीचे मेरीट सांगणारे नाहीत का? तुमच्याबरोबर असले तर मेरीट! आम्ही जर बरोबर असलो तर घराणेशाही, असे कसे काय चालेल, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

घराणेशाहीचे प्रॉडक्ट असल्याचा मला अभिमान

मला ते मान्य आहे. कारण मी स्वत: घराणेशाहीचे प्रॉडक्ट आहेच. मी प्रतिभा शरद पवार यांची मुलगी आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. भाजप खासदारांची, आमदारांची पहिली, दुसरी आणि तिसरी पिढी राजकारणात झाली तरीही चालतं. मात्र आम्ही केलं तर ती घराणेशाही ठरते, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला.

तुम्हाला मिळालं ते जनमत मग केजरीवालांना काय?

दिल्लीच्या जनतेने केजरीवाल यांना कौल दिला आहे. तिथे राज्यपाल ढवळाढवळ करत आहेत. तर दुसरीकडे केंद्र सरकार आम्हाला जनादेश मिळाला आहे म्हणून स्वत: गुणगान गाते आहे हा नेमका कुठला न्याय? तुम्हाला मिळाले ते जनमत मग केजरीवालांना काय मिळाले? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला.

कश्मीरमध्ये निवडणुका का नाहीत?

जम्मू-कश्मीरचे रूपांतर तुम्ही तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये केले. त्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी एक वर्षात तिथे निवडणूक घेतली जाईल, असे सांगितले होते. आज चार वर्षे झाली, पण तिथे निवडणूक घेण्यात आलेली नाही. या सगळ्याला मनमानी म्हणायचे नाहीतर काय, असाही प्रश्न सुप्रिया सुळेंनी केला.