दिव्यात खारफुटीची कत्तल; खाडीत बेकायदा भराव

 गेल्या कित्येक वर्षांपासून दिव्यातील खारफुटीच्या सौंदर्यावर भूमाफियांनी डोळा ठेवला आहे. साबे गावात असलेल्या खारफुटीची बेकायदा कत्तल करून त्या जागेवर भराव टाकून चक्क खाडी बुजविण्याचे काम सुरू आहे. दिवसाढवळ्या ही खाडी बुजवतंय कोण? असा प्रश्न स्थानिकांना पडला असून हे काम त्वरित थांबवा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला आहे. खारफुटीची कत्तल व खाडी बुजवल्यामुळे पर्यावरणाचा मोठा ऱहास होत असल्याने तज्ञांनीदेखील चिंता व्यक्त केली आहे.

एकीकडे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना दुसरीकडे ठाण्याला लागून असलेल्या खाडीत बेकायदा पद्धतीने भराव टाकण्याचे काम जोरात सुरू आहे. निवडणुकीच्या कामात शासकीय अधिकारी, कर्मचारी व्यस्त असल्याचा फायदा भूमाफिया घेत असून मुंब्रा, दिवा येथील खाडी बेकायदेशीरपणे चक्क पोलीस संरक्षणातच बुजवली जात असल्याचा भंडाफोड येथील स्थानिकांनी केला आहे.

पावसाळ्यात गावे बुडण्याची भीती

रात्रीच्या अंधारात दररोज शेकडो ट्रक या ठिकाणी भराव टाकण्याचे काम करीत असून यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातून कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. त्यामुळे येत्या पावसाळ्यात मुंब्रा, दिवा, साबे गाव पाण्याखाली बुडणार असल्याची भीती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे.

शेकडो पोलिसांचा फौजफाटा

दिवा गावातील साबे येथे खाडीलगत असलेल्या जमिनी तेथील शेतकरी कसत होते. काही दिवसांपूर्वी रात्रीच्या अंधारात पोलिसांनी येऊन संपूर्ण जमिनीवर कब्जा घेतला असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला. तसेच हळूहळू या ठिकाणी हजारो डंपरमधून माती टाकली जात असून सपाटीकरणासाठी पोकलेन आणि जेसीबी काम करीत आहेत. या जेसीबी, पोकलेन आणि डंपरचे संरक्षण करण्यासाठी रात्री शेकडो पोलीस तैनात असतात.

खारफुटीच्या जागेवर करण्यात येत असलेली भरणी बेकायदा असून उच्च न्यायालयाने हा परिसर सीआरझेडमध्ये समाविष्ट असल्याचे घोषित केले आहे. तरीही या ठिकाणी बेकायदेशीर भराव केला जात आहे. या विरोधात आगरी युवक संघटना जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात येणार असून तत्काळ भराव थांबविण्यात आला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

गोविंद भगत (आगरी युवक संघटना प्रमुख)