वीज कामगारांचा रखडलेला वेतन करार तत्काळ करा, अदानी इलेक्ट्रिसिटी विद्युत कामगार सेनेची मागणी

अदानी इलेक्ट्रिसिटीकडून मुंबई उपनगरात कार्यरत असलेल्या वीज कर्मचाऱयांचा वेतन करार करण्याबाबत टाळाटाळ केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर अदानी इलेक्ट्रिसिटी विद्युत कामगार सेनेच्या वतीने विभागीय कार्यालयांसमोर द्वारसभा घेत तत्काळ चर्चा करून वेतन करार मार्गी लावावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

अदानी समूहाने मुंबई उपनगरात वीज पुरवठा करणाऱया रिलायन्स एनर्जी पंपनीचा ताबा घेतल्यानंतर व्यवस्थापनाने आस्थापनातील कामगारांच्या समस्या सोडवण्याऐवजी त्यांना दहशतीखाली ठेवण्यास सुरुवात केली आहे. गेल्या वर्षभरापासून कामगारांच्या वेतन करारच्या मागणीपत्रावर चर्चा करण्याऐवजी टाळाटाळ करण्याची भूमिका व्यवस्थापनाने घेतली आहे. त्या पार्श्वभूमीवर अदानी इलेक्ट्रिसिटी विद्युत कामगार सेनेचे अध्यक्ष व स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे सरचिटणीस प्रदीप मयेकर यांच्या नेतृत्वाखाली द्वारसभा घेण्यात आल्या. कांदिवली शंकर लेन येथील द्वारसभेत बोलताना रखडलेला वेतन करार तत्काळ करावा, पंत्राटी कामगारांची नोकरभरती, कामगार व अधिकाऱयांच्या मुलांना नोकरभरतीत प्राधान्य द्यावे, कामगारांच्या बंद केलेल्या सुविधा त्वरित चालू कराव्यात, असे मयेकर यांनी स्पष्ट केले. तसेच यावर चर्चा करून तातडीने निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिली.