आंबेगावमध्ये डिझेल चोरीच्या घटनांमध्ये वाढ

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात रात्रीच्या वेळी घरासमोर उभे असलेल्या स्कूलबस, जेसीबी, हायवा, ट्रॅक्टर, यासह विवीध गाडीचे डिझेल टाकीतील डिझेल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अज्ञात चोरटे रात्रीच्या वेळी डिझेल चोरून नेत असल्याने वाहनचालक व वाहन मालकांनी संताप व्यक्त केला आहे. गेल्या काही दिवसात अंदाजे हजार ते दिड हजार लिटर डिझेल चोरीला गेले असून मंचर पोलिसांनी डिझेल चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी वाहन चालक व वाहन मालकांकडून होत आहे.

अवसरी बुद्रुक येथे शुक्रवारी रात्रीच्या वेळी ड्रायव्हरने घरासमोर लावलेल्या स्कूल बस मधील डिझेल टाकीतील अंदाजे 100 लिटर डिझेल अज्ञात चोरट्याने काढून नेले. शनिवारी सकाळी शाळा असल्याने ड्रायव्हर गाडी घेऊन काही अंतरावर गेला असता स्कूल बस अचानक बंद पडली त्यावेळी चालकाने टाकीचे झाकण उघडून पाहिले असता टाकीतील डिझेल चोरी झाल्याचे त्याच्या लक्षात आले. याबाबत त्याने मॅनेजरला कळवले असता मॅनेजरने याबाबत मंचर पोलिसांना माहिती दिली, तर पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. याच प्रकारे अवसरी गावातील हायवा, जेसीबी, ट्रॅक्टरचे डिझेल चोरीच्या घटना घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी चांडोली येथे सुद्धा स्कूल बसचे डिझेल चोरीचा प्रकार घडला आहे. पोलीस गावात फिरकत नसल्याने छोट्या-मोठ्या चोऱ्या, डिझेल चोरीचे प्रकार वाढले आहेत.