सानिया-शोएब यांच्यात पुन्हा दुरावा?

हिंदुस्थानची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा आणि तिचा पती पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांच्यात पुन्हा दुरावा निर्माण झाल्याच्या बातम्या येत आहेत. काही महिन्यांपूर्वीही त्यांच्या घटस्फोटाची खूप चर्चा झाली होती, पण त्यानंतर हे प्रकरण शांत झाले. मात्र शोएबने स्वतःच्या इन्स्टाग्राम प्रोफाईलमध्ये मोठा बदल केल्याने पुन्हा एकदा सानिया व त्याच्यातील घटस्फोटांच्या अफवांना उधाण आले आहे.

खरंतर शोएब मलिकने यापूर्वी आपल्या इन्स्टाग्राम बायोमध्ये ‘सुपरवुमन सानिया मिर्झाचा नवरा’ असे लिहिले होते, मात्र आता त्याने आपल्या बायोमध्ये बदल करून ‘लिव्ह अनब्रोकन’ असे लिहिले आहे. त्यामुळे त्यांच्या घटस्फोटाच्या अफवा पुन्हा सुरू झाल्या आहेत. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये उभय खेळाडूंमध्ये घटस्फोट झाल्याचा दावाही केला जात आहे, मात्र याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. विशेष म्हणजे याआधी आलेल्या रिपोर्ट्समध्ये शोएब मलिकने सानिया मिर्झाची फसवणूक केल्याचे बोलले जात होते. शोएबचे पाकिस्तानी अभिनेत्री आयशा उमरसोबत अफेअर आहे. शोएब आणि आयशाचे फोटोही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.