कुत्र्याला फिरवण्यावरून वाद झाला, बँकेच्या सुरक्षा रक्षकाने केलेल्या गोळीबारात दोघांचा मृत्यू

इंदूरच्या खजराना पोलीस स्टेशन हद्दीतील कृष्णा बाग परिसरात गुरुवारी रात्री कुत्र्याला फिरवण्यावरून वाद झाला होता. हा वाद इतका विकोपाला गेला की एका व्यक्तीने गोळीबार केला ज्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या गोळीबारात एका महिलेसह सहा जण जखमी झाले आहेत. आरोपीने आधी हवेत गोळीबार केला होता मात्र नंतर त्याने वाद घालणाऱ्यांवर गोळ्या चालवल्या होत्या. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याची परवाना असलेली बंदूक जप्त केली आहे.

अतिरिक्त पोलीस उपायुक्त अमरेंद्र सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. खजराना पोलीस स्टेशन हद्दीतील रामकृष्ण कॉलनीत राहणारा बँक सुरक्षा रक्षक राजपाल सिंह राजावत हा त्याच्या पाळीव कुत्र्याला फिरवत होता. या कुत्र्यावर त्याच परिसरात राहणाऱ्या विमलने दगड मारला होता. यावरून सिंह आणि विमलमध्ये वाद झाला होता. विमलनच्या मदतीला त्याचा नातेवाईक राहुल देखील आला होता. विमल हा राहुल याचा मेहुणा आहे. विमल आणि राहुलला घाबरवण्यासाठी राजपालने घरातून बंदूक आणली आणि हवेत गोळीबार केला. काही वेळाने त्याने विमल आणि राहुल यांच्यावर गोळीबार केला, त्यात त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. राहुल आणि विमलची कुटुंबे आणि त्यांच्या ओळखीचे लोकं सिंह याच्या घराबाहेर जमा झाले होते. या जमावामध्ये सीमा, ज्योती, ललित, कमल आणि मोहित हे देखील होते. सिंह याने जमलेल्या जमावार गोळ्या झाडल्या होत्या. ज्यात 6 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. सिंह याने 12 बोअरच्या बंदुकीतून गोळी झाडल्याचे सांगण्यात येत आहे. ज्योती आणि इतरांच्या डोळ्यावर आणि चेहऱ्यावर गोळ्या लागल्या आहेत.मृत्यूमुखी पडलेल्या विमलचे निपानिया येथे सलून आहे. त्याचा विवाह राहुलची बहीण आरती हिच्याशी 8 वर्षांपूर्वी झाला होता. त्याला दोन मुलीही आहेत. राहुल लासुदिया भागातील एका कार्यालयात काम करतो. या घटनेनंतर आरोपी राजपाल सिंग याला पोलिसांनी अटक केली असून तो बँक ऑफ बडोदामध्ये सुरक्षा रक्षक म्हणून कामाला आहे.