मुंबईच्या भार्गव भट यांना ‘इन्फोसिस प्राइज’; ‘मॅथमॅटिकल सायन्स’मधील उत्कृष्ट कामगिरीसाठी गौरव

इन्फोसिस सायन्स फाऊंडेशनतर्फे बंगळुरूमध्ये झालेल्या सोहळ्यात ‘इन्फोसिस प्राइज 2023’च्या विजेत्यांना गौरवण्यात आले. यामध्ये मुंबईतील भार्गव भट यांना मॅथमॅटिकल सायन्स या विषयातील उत्कृष्ट कामगिरीसाठी ‘इन्फोसिस प्राइज’ने गौरवण्यात आले.

 मागील 15 वर्षांपासून या पुरस्कारांचे आयोजन करण्यात येते. सहा क्षेत्रांतील लक्षणीय कामगिरीसाठी हे पुरस्कार दिले जातात. या वर्षीच्या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे नोबेल पुरस्कार विजेते,  ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटीतील खगोलशास्त्राचे  प्राध्यापक  प्रा. ब्रायन श्मिट होते.

 इंजिनीअरिंग ऍण्ड कॉम्प्युटर सायन्ससाठीचा इन्फोसिस  पुरस्कार आयआयटी कानपूरचे प्राध्यापक सच्चिदानंद त्रिपाठी यांना देण्यात आला. ह्युमॅनिटीज विभागातील पुरस्कार ‘सायन्स गॅलरी बंगळुरू’च्या संस्थापक जान्हवी फाळके यांना मिळाला. लाईफ सायन्ससाठी आयआयटी कानपूरचे प्राध्यापक अरुण कुमार शुक्ला यांना तर फिजिकल सायन्सेससाठी नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेसचे प्राध्यापक मुकुंद थत्तई यांना प्रदान करण्यात आला. सोशल सायन्सेसचा पुरस्कार कोलंबिया युनिव्हर्सिटीतील पॉलिटिकल सायन्सच्या प्राध्यापक करुणा मंटेना यांना मिळाला.