IPL 2024 – ‘जॉस’ लढला आणि जिंकला! कोलकाताचा पराभव करत राजस्थान दोन विकेटने विजयी

जॉस बटलरच्या तुफानी खेळीने अशक्य वाटणारा विजय राजस्थानच्या पारड्यात पडला आणि 224 धावांचे आव्हान यशस्वीरित्या पूर्ण झाले. 60 चेंडूंमध्ये 6 षटकार आणि 9 चौकारांच्या मदतीने शतक ठोकत 107 धावांची तुफान खेळी बटलरने केली आणि अवघ्या दोन विकेटने राजस्थानचा विजय झाला. एका बाजूने विकेट पडत असताना बटलरची संयमी खेळी महत्वपूर्ण ठरली. यशस्वी जयसवाल (19), संजू सॅमसन (12) यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. रियान पराग (34) आणि पॉवेल (26) आणि बटलर यांच्या धावा संघाच्या विजयामध्ये महत्वाच्या ठरल्या. कोलकाताकडून हर्षित राणा, सुनिल नारायण, वरून यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. वैभव अरोराला एक विकेट घेण्यात यश आले.

कोलकाताच्या ईडन गार्डनवर रंगलेल्या या सामन्यात राजस्थाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. फलंदाजीसाठी कोलकाताला आमंत्रित करण्यात आले. मात्र, सलामीला आलेला सॉल्ट (10) स्वस्तात माघारी परतला आणि अवघ्या 21 या धावसंख्येवर कोलकाताला पहिला हादरा बसला. मात्र सुनील नारायणने एका बाजूने आक्रमक खेळ सुरू ठेवला. नारायणने 6 षटकार आणि 13 चौकारांच्या मदतीने 109 धावांची शतकी खेळी केली. सॉल्ट बाद झाल्यानंतर आलेल्या रघुवंशी (30), श्रेयस अय्यर (11), रस्सल (13), रिंकू सिंग (20) यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. राजस्थानकडून आवेश खान, कुलदीप सेन यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. तर, बोल्ट आणि चहल यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.