IPL 2024 – संघर्ष अन् थरारानंतर मुंबईची सरशी

क्षणाक्षणाला फलंदाज आणि गोलंदाजांमध्ये झालेला संघर्ष आणि त्यामुळे थरारक वळणावर असलेल्या सामन्यात आशुतोष शर्माच्या 7 षटकारांनी पंजाब किंग्जला विजयासमीप आणले होते. शेवटच्या 6 चेंडूंत 11 धावांची गरज असताना कॅगिसो रबाडा धावचीत झाला आणि मुंबई इंडियन्सने 9 धावांनी थरारक विजय मिळवत आपल्या तिसऱया विजयाची नोंद केली.

मुंबईच्या 193 धावांचा पाठलाग करताना जसप्रीत बुमरा आणि जिराल्ड कोत्झीने 14 धावांत 4 फलंदाज बाद करत हा सामना एकतर्फी केला होता. मात्र त्यानंतर शशांक सिंग (41) आणि आशुतोष शर्माने  (61) आठव्या विकेटसाठी केलेल्या 57 धावांच्या झंझावाती भागीने सामन्याला कलाटणी देण्याची करामत केली. मात्र शर्मा बाद झाल्यावर मुंबईने सामन्यावर पुन्हा पकड घेण्याचा प्रयत्न केला आणि पंजाब विजयासमीप असूनही विजयी लक्ष्य गाठू शकला नाही. 4 षटकांत 21 धाकांत पंजाबचे 3आघाडीकीर बाद करणारा बुमरा सामनाकीर ठरला.

तत्पूर्वी गेल्या सामन्यात शून्यावर बाद झालेल्या सूर्यकुमार यादवच्या झंझावाती फटक्यांनी पंजाब किंग्जचे गोलंदाज अक्षरशः होरपळले. त्याने 53 चेंडूंत फोडून काढलेल्या 78 धावांच्या खेळीमुळे मुंबई इंडियन्सने 192 धावांची दमदार मजल मारली.

आज मुंबईची इशान किशन आणि रोहित शर्माची जोडी फार तळपली नाही. फलकावर केवळ 18 धावा होत्या आणि इशानने आपली विकेट फेकली. मग सूर्यकुमारची एण्ट्री झाली आणि त्याने स्टेडियममध्ये हवाई हल्ले सुरू करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. सूर्याच्या बॅटीतून चौकार-षटकारांची बरसात होत होती तेव्हा रोहित शर्माने केवळ नयनसुख घेतले आणि संधी मिळताच स्वताही पंजाबच्या चेंडूंना मैदानाबाहेर फेकले.

शर्माने सूर्यासह 81 धावांची भर घातली. रोहितची खेळी 36 धावांवर संपली, पण त्यानेही 3 षटकार आणि 2 चौकार खेचले. मग सूर्याने तिलक वर्मासह 49 धावांची भागी रचली. आज सूर्या आपले विक्रमी सहावे शतक ठोकणार असे चित्र उभे राहिले होते, पण 3 षटकार आणि 7 चौकारांची आतषबाजी केल्यानंतर त्याचा झंझावात 78 धावांवर थांबला. हार्दिक पंडय़ा आणि टीम डेव्हिड धावा कुटण्याच्या प्रयत्नात लवकर बाद झाले. 19 व्या षटकांत डेव्हिडने 18 धावा वसूल केल्या.