IPL 2024 – राजस्थानचा ‘जोस’ हाय… विजयाचा चौकार ठोकला, बंगळुरुच्या पराभवाची हॅटट्रिक

विराट कोहलीच्या विक्रमी शतकावर जोस बटलर याने पाणी फिरवले. बटरलने झळकावलेल्या खणखणीत शतकाच्या बळावर राजस्थान रॉयल्सने विजयाचा चौकार ठोकला. जयपूरमध्ये झालेला हा सामना राजस्थानने 6 विकेट्सने आपल्या नावे केला आणि गुणतालिकेमध्ये अव्वल स्थान कायम राखले. जवळपास 200च्या स्ट्राईक रेटने शतक करणाऱ्या जोस बटलरला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

बंगळुरूने विजयासाठी दिलेल्या 183 धावांचा पाठलाग राजस्थानने घरच्या मैदानावरील प्रेक्षकांच्या साक्षिने आरामात केला. यशस्वी जैस्वाल शून्यावर बाद झाल्यानंतर जोस बटलर आणि कर्णधार संजू सॅमसन यांनी शतकीय भागीदारी करत संघाला विजयाची कवाडे उघडून दिली. अर्धशतकानंतर संजू बाद झाला. त्याने 42 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 69 धावा केल्या.

संजू बाद झाल्यानंतर फॉर्मात असणारा रियान पराग (4) आणि ध्रुव जुरेल (2) हे दोघेही झटपट बाद झाला. मात्र तोपर्यंत सामना राजस्थानच्या बाजूने झुकला होता. बटरलने हेटमायरच्या मदतीने विजयाची औपचारिकता पूर्ण केली. बटलर 58 चेंडूत 100 धावा काढून नाबाद राहिला. या खेळीदरम्यान त्याने 9 चौकरा आणि 4 षटकार ठोकले. तर हेटमायरने नाबाद 11 धावा केल्या.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना बंगळुरुला विराट कोहली आणि कर्णधार फाफ ड्यू प्लेसिस यांनी शतकीय सलामी दिली. मात्र दोघांनीही प्रमाणापेक्षा संथ खेळी केल्याने बंगळुरुला 200 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. ड्यू प्सेसिसने 33 चेंडूत 44 धावा केल्या, तर विराट कोहली 72 चेंडूत 113 धावा काढून नाबाद राहिला. विराटचे आयपीएलमधील हे विक्रमी 8 वे शतक ठरले. या दोघांच्या बळावर बंगळुरूने 20 षटकात 3 बाद 183 धावा केल्या. मात्र या आव्हानाचा बचाव बंगळुरुच्या गोलंदाजांना करता आला नाही आणि बंगळुरूने सलग तिसरा सामना गमावला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Marathi Fire (@marathifire)