सायबर ठगांना पोलिसांचा दणका 

क्रेडिट कार्ड रिवॉर्ड रीडिमच्या नावाखाली बँक खात्यावर डल्ला मारू पाहणाऱया सायबर ठगांना एमएचबी पोलिसांनी दणका दिला आहे. पोलिसांनी वेळीच कारवाई करून 1 लाख 45 हजार रुपये वाचवले आहेत. एमएचबी पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

तक्रारदार हे बोरिवली येथे राहतात. नुकताच त्यांना ठगाने पह्न केला. त्याने तो खासगी बँकेतून बोलत असल्याचे भासवले. क्रेडिट कार्डचे रिवॉर्ड पॉइंट रीडिमच्या नावाखाली बोलबच्चन देण्यास सुरुवात केली. त्यानंतर ठगाने तक्रारदार यांच्याकडून 1 लाख 45 हजार रुपये उकळले. पैसे गेल्याचे त्यांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी एमएचबी पोलीस ठाण्यात धाव घेतली. वरिष्ठ निरीक्षक सुधीर कुडाळकर यांच्या पथकातील उपनिरीक्षक मंगेश किरपेकर, रवींद्र पाटील, सोनाली इलग आदीच्या पथकाने तपास सुरू केला.

फसवणुकीचे पैसे ज्या खात्यात गेले, त्या खात्याची माहिती काढली. पोलिसांनी एका ई-वॉलेट पंपनीच्या नोडल अधिकाऱयाशी संपर्क साधला. संपर्क साधून फसवणूक झालेली रक्कम गोठवली. ती रक्कम तक्रारदार यांना परत मिळवून दिली.