फुकटय़ा प्रवाशांमुळे कोकण रेल्वे मालामाल 

उन्हाळय़ाच्या सुट्टीत कोकण रेल्वेने विनातिकीट प्रवास करणाऱया प्रवाशांमुळे कोकण रेल्वे मालामाल झाली आहे. एप्रिल महिन्यात 15 हजार 129 फुकटे प्रवासी सापडले असून या प्रवाशांकडून तब्बल 2 कोटी 69 लाख 85 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. कडक तिकीट तपासणी मोहीम सुरू राहणार असल्यामुळे प्रवाशांनी वैध तिकिटांसह प्रवास करा, असे आवाहन कोकण रेल्वेने केले आहे.

उन्हाळय़ाच्या सुट्टीत कोकणात जाणाऱयांची तसेच कोकणातून मुंबईत फिरायला येणाऱयांची संख्या अधिक होती, मात्र या प्रवाशांमध्ये अनेक प्रवासी विनातिकीट प्रवास करत असल्याचे आढळले. एप्रिलमध्ये कोकण रेल्वे मार्गावर केलेल्या तिकीट तपासणीत 15,129 प्रवासी विनातिकीट प्रवास करत असल्याचे आढळले. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून एकूण 2 कोटी 69 लाख 85 हजार 256 रुपयांचा दंड वसूल केला. म्हणजेच रोज सरासरी 504 विनातिकीट प्रवाशांना पकडून सरासरी सुमारे 9 लाखांची दंड वसुली केली जात आहे. कोकण रेल्वेवर मार्गावर फुकटय़ा प्रवाशांकडून वसूल केलेला हा सर्वाधिक दंड आहे.